
उरण तालुक्यातील पागोटे आणि भेंडखळ येथील शेकडो एकर खारफुटीवर भराव टाकून ती नष्ट केल्याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात नवी मुंबई सेझ(एनएमएसईझेड) च्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण कायदा 1986 च्या कलम 15, 19 नुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीच्या भेंडखळ जवळील करंजा कोस्टल रोडच्या बाजूच्या जागेतील सुमारे 150 एकर जमिनीवरील कांदळवन आणि भेंडखळ जवळील 7 ते 8 एकर जमिनीवरील खारफुटीवर भराव करून ती नष्ट करण्यात आली आहे. खोपटे खाडी किनारी असलेल्या या भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात खारफुटी होती. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मिळत असत आणि विविध प्रकारच्या पक्षांचा येथे वावर असे. मात्र रिलायन्सने सिडकोकडून ही जमिन विकत घेतल्यानंतर या जमिनी भोवताली कंपाऊंड बांधून त्या जागेमध्ये डेब्रिज आणि दगड मातीचा भराव केला. त्यामुळे या जागेतील खारफुटी गाडली गेली आणि काही खारफुटी पाण्याअभावी मेली. या बाबत अनेकांनी तक्रारी केल्यानंतर तलाठी हसुराम वाघ आणि मंडल अधिकारी मच्छिंद्र मोहिते यांनी चौकशी करून रिलायन्स सेझ (एनएमएसईझेड) च्या अधिकाऱ्यांविरोधात खारफुटी नष्ट केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
या बाबत उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे विचारणा केली असता उरण तालुक्यात अशा प्रकारे खारफुटी तोडणाऱ्यांची गैर केली जाणार नाही. उरण महसूल हद्दीत अशा प्रकारचे 10 ते 12 खारफुटी तोडल्याचे गुन्हे आम्ही दाखल केले असल्याचे सांगितले.



























































