भाजपला रोखण्यासाठी ‘राजद’चे नितीशना ‘शुकशुक’, विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारमध्ये ऑक्टोबर 2020मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाला साथ द्यावी, अशी ऑफर देत भाजपला पराभूत करण्यासाठी संयुक्त जनता दलासह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे आता आवश्यक आहे, अशी भूमिका राष्ट्रीय जनता दलाने  मांडली.

राष्ट्रीय जनता दलाने बिहारमधील  विरोधी पक्षांची एकत्र मोट बांधून सत्ताधारी भाजपविरोधात येत्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले. आरजेडीचे वरिष्ठ नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी आज पक्षाची भूमिका मांडली. ‘भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी बिहारमधील सगळय़ा राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्याशिवाय विरोधी पक्षांकडे अन्य पर्याय नाही,’ असे सिंह म्हणाले. त्यामुळे नितीश कुमार हटावो म्हणणार्‍या आरजेडीने आता कालच्या घोषणेपासून फारकत घेत भाजपविरोधात सर्वपक्षीयांना एकवटण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

‘दो हजार बीस, हटावो नितीश’

केंद्रात आणि राज्यात भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या नितीश कुमार यांच्यावर लालूप्रसाद यादव यांनी काल जोरदार हल्ला केला होता. ‘दोन हजार बीस, हटावो नितीश’ अशी घोषणा दिली होती. मात्र, त्याच्या दुसर्‍याच दिवशी आज घुमजाव करत नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलासह सर्वपक्षीयांनी भाजपविरोधात एकत्र येण्याची गरज आरजेडीने व्यक्त केली आहे.

टग ऑफ वॉर

झारखंड सशस्त्र पोलीस दलाच्या 140 व्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ‘टग ऑफ वॉर’ या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही सहभाग घेतला. जोर लगा के हैशा… म्हणत या अधिकार्‍यांनी आपला जोर दाखवला.