
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या नाराज असून त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. आपण भाजपवर नाराज नाही. पक्षाबाबात आपली कोणतीही तक्रार नाही. आपली नाराजी पक्षातील देवेंद्र फडणवीस यांच्या गटावर असल्याचे स्पष्ट करत योग्यवेळी आपल्या मनातील रोष व्यक्त करू असे खडसे म्हणाले. खडसे सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
गेल्या पाच वर्षांत पक्षाकडून नाही, तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गटाकडून आपल्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे, असेही खडसे म्हणाले. योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य त्या व्यक्तींबाबत आपण आपला रोष व्यक्त करू असे त्यांनी सांगितले. आपली पक्षावर काहीही नाराजी नाही. पक्षाबाबत कोणतीही तक्रार नाही. काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक आपल्यावर अन्याय केले आहेत. त्यामुळे पक्षाचेच नुकसान झाले आहे, असे त्यांनी सांगितले. त्या व्यक्ती कोण आहेत, असे विचारल्यावर आपण त्यांचे नाव कधीही लपवले नाही, आपली नाराजी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या गटावर असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे खडसे अजूनही नाराज असल्याचे स्पष्ट होत असून त्यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
































































