
पावशी-बोरभाटवाडी येथील भूसंपादनप्रश्नी लवादाकडे झालेल्या निकालानंतर उपविभागीय अधिकारी कुडाळ यांनी अर्जदार सुप्रिया राजू मेहता यांना दीड वर्ष 11 लाख 96 हजार रुपये अदा केले नाहीत. या विरोधात सुप्रिया मेहता यांनी ओरोस येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला होता. तरीही कुडाळ प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुडाळ यांनी ती रक्कम मेहता यांना अदा न केल्याने जिल्हा न्यायाधीश यांनी उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांच्या कार्यालयातील वस्तू जप्त करण्याचे आदेश दिले.
त्या आदेशानुसार सोमवारी 12 वाजता उपविभागीय अधिकारी कुडाळ कार्यालयातील खुर्च्या, टेबले, सोपा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली ती कारवाई 3 वा.पर्यंत सुरूच होती. दरम्यान सायं. 5 वा.च्या सुमारास उपविभागीय अधिकारी कुडाळ यांनी धावपळ करत ओरोस येथील जिल्हा न्यायालयात या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी अर्ज केला.


























































