
‘जय जय राम कृष्ण हरी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘विठ्ठल सावळा’ आणि शिवसेनाप्रमुखांच्या गजराच्या भक्तिरसात कुरारवासीय न्हाऊन निघाले. निमित्त होते शिवसेनेनेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भव्य नॉन स्टॉप भजन स्पर्धा 2020’चे.
शिवसेना नेते -खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या संकल्पनेतून कुरार व्हिलेज तानाजीनगर येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘साहेब उत्सवा’त या भव्य भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्थानिक कलाकारांच्या कलेला व्यासपीठ मिळावे व त्यांचा सन्मान करण्यात यावा यासाठी ही स्पर्धा आयोजित केली होती. सुनील गुजर आणि शिवसेना शाखा क्रमांक 36 व 37 आयोजित या स्पर्धेवेळी विधानसभा संघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, विधानसभा संघटक, पूजा चौहान, रीना सुर्वे, उपविभागप्रमुख सुनील गुजर, प्रदीप निकम, उपविभाग समन्वयक कृष्णा देसाई, कृष्णकांत सुर्वे, उपविभाग संघटक, ऋचिता आरोसकर सानिका शिरगावकर, नमिता कल्याणकर उपस्थित होते.
दोन दिवस भजन उत्सव
दोन दिवस चालणार्या या भजन स्पर्धेत 20 भजन मंडळे आपली कला सादर करणार आहेत. या स्पर्धेत यशस्वी होणार्या मंडळांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक विजेत्या मंडळास सिद्धिविनायक न्यास प्रभादेवी येथे एकदिवसीय सेवेची संधी मिळणार आहे. याशिवाय उत्कृष्ट गायक, पखवाज वादक, हार्मोनियम वादक झांजवादक यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून संतोष राणे व संजय घाडी यांनी काम पाहिले. तर मालाडचे प्रसिद्ध भजनी बुवा श्रीपती नाडणकर, अरुण मांजरेकर, गणेश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात झाली.




























































