कोरोनाच्या संशयावरून मुंबई-पुण्यातील दहा जण रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळून आलेला नाही, मात्र मुंबई, पुणे व नांदेडमध्ये दहा संशयित रुग्ण दाखल झाले असून त्यांचे वैद्यकीय चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. मुंबई विमानतळावर आतापर्यंत 4 हजार 600 प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात सध्या 27 प्रवासी निरीक्षणाखाली असून त्यातील दहा प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सहा जणांना मुंबई येथे, तीन जणांना पुणे येथे आणि एकाला नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे. या दहा जणांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित चार जणांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तीन जणांचे नमुने दुसऱयांदा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचाही वैद्यकीय चाचणी अहवाल अद्याप मिळालेला नाही. ‘कोरोना’ च्या रुग्णांसाठी मुंबईत कस्तुरबा आणि पुणे येथे नायडू रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत.