
सोशल नेटवर्किंग साइटवरून आपल्या चाहत्यांशी नियमित संवाद साधणारे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ट्विटर फॉलोअर्सचा आकडा आज चार कोटींवर पोहोचला. बॉलीवूडमधील बहुतांश कलाकारांची ट्विटर अकाऊंट आहेत, पण त्यामध्ये सर्वात जास्त अमिताभ हेच सक्रिय असतात. अमिताभ बच्चन हे सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ट्विटरप्रमाणेच फेसबुक, इन्स्टाग्रामवरही त्यांचे अकाऊंट आहे. टंबलरवर त्यांचा वैयक्तिक ब्लॉगही आहे. हजारो चाहते दररोज या अकाऊंटवर अमिताभ यांना फॉलो करत असतात. त्यांनी लिहिलेले संदेश, जागवलेल्या आठवणी यांना लाइक्स करत असतात. त्यावर प्रतिक्रियाही देत असतात. ट्विटरवर अमिताभ यांचे आता 4 कोटी 2 हजार 202 फॉलोअर्स झाले आहेत आणि त्यात वाढ होत आहे. फेसबुकवर त्यांचे 2 कोटी 70 लाख तर इन्स्टाग्रामवर 1 कोटी 40 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांच्यानंतर 3 कोटी 90 लाख ट्विटर फॉलोअर्ससह शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर आहे.































































