सीएएविरोधात बोलणे महाग पडले, कवीला उबेर चालकाने थेट नेले पोलीस ठाण्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोनवरून सीएए आणि एनआरसीविरोधात बोलणाऱया जयपूरच्या आंदोलक कवीला उबेरच्या कॅबचालकाने थेट पोलीस ठाण्यात नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जयपूरमधील युवा कवी बप्पादित्य सरकार याला बुधवारी हा अनुभव मुंबईत आला. ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह कुमन असोसिएशनच्या सचिल कविता कृष्णन यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती देऊन हा प्रकार उघडकीस आणला. रोहित सिंह असे ड्रायव्हरचे नाव असून याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. ही घटना म्हणजे देशातील सद्यस्थितीचे प्रतिबिंब असल्याची प्रतिक्रिया कवी बप्पादित्यने दिली.

कविता कृष्णन यांच्या ट्विटनुसार बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास उबेरच्या कॅबने बाप्पादित्य सरकार जुहू येथून कुर्ल्याला निघाले होते. त्यावेळी ते मोबाईलवरून पलीकडच्या व्यक्तीशी सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसीसंदर्भात बोलत होते. दिल्लीतील शाहीन बागेचा मुद्दाही त्यांच्या चर्चेत होता. हे सर्व बोलणे कॅबचालक ऐकत होता. त्याने काही केळाने एटीएममधून पैसे काढायचे आहेत, असे सांगत एके ठिकाणी गाडी थांबवली. गाडीतून उतरल्यावर तो थेट दोन पोलीस घेऊनच पुन्हा गाडीजवळ आला.

पोलिसांनी बप्पादित्य याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी आपण जयपूरहून आलो आहोत. मुंबईमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात जे आंदोलन सुरू आहे त्यात सहभागी होणार आहोत, असे बप्पादित्यने पोलिसांना सांगितले.

बप्पादित्य गाडीमध्ये कोणाशी तरी बोलताना देश जाळण्याची चर्चा करीत होते. ते डाव्या विचारांचे आहेत, असे कॅबचालक रोहित सिंगने पोलिसांना सांगितले. त्याचबरोबर सरकार यांचे बोलणे आपण आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केले आहे, असेही तो पोलिसांना म्हणाला. पोलिसांनी कॅबचालकाविरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. कोणीही तक्रार दिली नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

देशभरात निदर्शने सुरू असताना मी शांत कसा बसू
जेव्हा आपली विचारांची लढाई असते तेव्हा हिंसा कुठून आणि कशी होते हे समजून घ्यायचे असते. देशात सध्या काय परिस्थिती आहे याचे प्रतिबिंब टॅक्सीचालकाच्या अरेरावीतून दिसते. देशभरात निदर्शने सुरू असताना मी घरी स्वस्थ कसा बसू. अशा स्थितीत माझ्या देशासाठी, देशातील माणसांसाठी घराबाहेर पडणे हीच माझी जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया बप्पादित्य सरकारने घटनेनंतर दिली. ‘ मी तुला कुठेही घेऊन गेलो असतो, पण आभार मान पोलीस ठाण्यात घेऊन आलो. टॅक्सीचालकाचे हे एक वाक्य सतत माझ्या डोक्यात फिरत आहे,’ असेही बप्पादित्यने सांगितले. दरम्यान, नागपाडा येथील आंदोलनात बप्पादित्य आज सहभागी झाला.