
तामीळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपलेल्या असतानाच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आपल्या पक्षाची स्थापना एप्रिलमध्ये करणार आहेत. 1996 साली तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरुद्ध बोलल्यानंतर तब्बल 22 वर्षांनंतर रजनीकांत आपला पक्ष स्थापन करत आहेत. दोनच वर्षांपूर्वी 31 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली होती.
शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत यांचे निकटवर्तीय रजनी मक्कल मंदरम यांनी या वृत्ताला दुजोरा देताना म्हटले की, रजनीकांत यांचा पक्ष 14 एप्रिलनंतर कधीही स्थापन केला जाऊ शकतो. पक्षाचे नाव मात्र अजून ठरलेले नाही. यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी स्वतःच्या ‘मक्कल निधी मय्यम’ नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे.
अण्णा द्रमुक, पीएमके, एनडीएची साथ
तामीळनाडूमध्ये अण्णा द्रमुक, पीएमके आणि एनडीए पक्षांची रजनीकांत यांना साथ असेल. आणखीही काही राजकीय पक्ष त्यांच्या पक्षस्थापनेची वाट पाहात आहेत, असे रजनीकांत यांचे सल्लागार तिमिलरुवी मणियम यांनी सांगितले.

























































