कॉफीमध्ये झुरळ सापडल्यास तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल का? वाचा बातमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉटेल किंवा कॅफेमध्ये बसून कॉफीचे घोट घेत काम करणं किंवा मित्रमंडळींसोबत गप्पांचा फड जमवणं अनेकांना आवडतं. पण, कधीकधी कॅफेच्या अस्वच्छतेमुळे आपल्या कॉफीच्या कपमध्ये झुरळ, माशी इत्यादी किटक पडून याच आनंदावर विरजण पडू शकतं. अशावेळी अनेकजण ऑर्डर रिप्लेसमेंटची मागणी करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का, की झुरळ किंवा किटक पडलेली कॉफी दिल्याप्रकरणी तुम्हाला नुकसान भरपाईही मिळू शकते.

कॉफीत झुरळ सापडल्याने ग्राहक न्यायालयाने सीसीडी या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘कॅफे कॉफी डे’ला 13 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. नवी मुंबई येथील दोन ग्राहकांनी कॉफीत झुरळ सापडल्याची तक्रार करत ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. प्राची पाटील आणि रमेशचंद्र कुमावत अशी या तक्रारदारांची नावं आहेत. पाटील आणि कुमावत हे दोघं 16 जानेवारी 2018 रोजी कुर्ला येथील मॉलमध्ये असलेल्या सीसीडीच्या शाखेत बसले होते. त्यांनी तिथे कॉफी ऑर्डर केली. कॉफी पिऊन झाल्यानंतर पाटील यांना त्यांच्या कॉफीच्या कपमध्ये झुरळ असल्याचं दिसलं. ते पाहून पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्या दोघांनीही याची तक्रार केली. मात्र, सीसीडीच्या शाखाचालकाने त्यांना त्यांच्या ग्राहक तक्रार निवारणाकडे इमेल करण्यास सांगितलं. त्यानुसार मेल आणि त्यासोबत पुरावे देऊनही सीसीडीकडून त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे पाटील आणि कुमावत यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यांनी न्यायालयात कॉफीच्या 224 रुपयांच्या बिलाची प्रत, सीसीडीला केलेल्या ईमेलची प्रत आणि झुरळ असलेल्या कपाची छायाचित्रं पुराव्यादाखल सादर केली. सीसीडीने त्यांच्यावरील आरोपांचं खंडन केलं. तक्रारदार वकील असल्याने पैशांसाठी कायद्याचा गैरवापर करत आहेत. तसेच तक्रारदारांनी स्वतःच ते झुरळ आणून त्यांच्या कपमध्ये टाकलं होतं, असा युक्तिवादही सीसीडीतर्फे करण्यात आला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सीसीडी व्यवस्थापनाला या प्रकरणात दोषी ठरवलं. तक्रारदार हे नवी मुंबईत राहतात आणि ही घटना कुर्ला येथील शाखेत घडली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी इतक्या लांब येऊन असं करणं हे अतार्किक आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. तसंच, कुर्ला शाखेकडे न्यायालयाने स्वच्छतेशी संबंधित नियमांचं पालन करत असल्याची कागदपत्रं मागितली होती. मात्र, सीसीडीतर्फे ती कागदपत्रं सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे न्यायालयाने सीसीडीने तक्रारदारांना 13 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिले.