#INDvsNZ बुमराहचा फॉर्म ‘गुमराह’, न्यूझीलंडविरुद्ध एका विकेटसाठी तरसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि न्यूझीलंडमधील तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिका नुकतीच संपली. या मालिकेत यजमान संघाने निर्भेळ यश मिळवले आणि हिंदुस्थानला ‘व्हाईटवॉश’ दिला. या संपूर्ण मालिकेमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ‘आऊट ऑफ फॉर्म’ दिसला. संपूर्ण मालिकेत बुमराहला चक्क एकही विकेट घेतला आली नाही. बुमराहच्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये पहिल्यांदाच असे झाले आहे की संपूर्ण मालिकेत त्याला एकही विकेट मिळाली नाही.

मंगळवारी झालेल्या लढतीत टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 297 धावांचे आव्हान ठेवले होते. जयप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल आणि रविंद्र जाडेजा सारखे दिग्गज गोलंदाज असतानाही टीम इंडियाला या धावांचा बचाव करता आला नाही. न्यूझीलंडने हे आव्हान 48 व्या षटकामध्ये पार केले आणि 5 विकेट्सने विजय मिळवला. या लढतीतही बुमराह सपशेल अपयशी ठरला. बुमराहने आपल्या 10 षटकांच्या गोलंदाजीमध्ये 50 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेतला आली नाही.

न्यूझीलंडने टी-20 मालिकेतील पराभवाचे उट्टे काढले, वन डे मालिकेत हिंदुस्थानला ‘व्हाईटवॉश’

याच लढतीत नाही तर पहिल्या दोन लढतींमध्येही बुमराह आपल्या विकेटच्या कॉलममधीळ भोपळा फोडू शकलेला नाही. दुखापतीनंतर मैदानात उतरलेल्या बुमराहच्या गोलंदाजीची धार कमी झाल्याचे जाणवत आहे. पहिल्या लढतीत टीम इंडियाने 347 धावांचे बलाढ्य लक्ष्य न्यूझीलंडला दिले होते. मात्र हे आव्हानही न्यूझीलंडने लिलया पार केले. या लढतीत बुमराहने 10 षटकांच्या गोलंदाजीत 53 धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडचा संघ 273 धावा करू शकला. या लढतीतही बुमराहने 10 षटकात 64 धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही.

बुमराहने न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येक लढतीत 5 पेक्षा जास्त सरासरीने धावा दिल्या. मोक्याच्या क्षणी धावा रोखणारा आणि विकेट मिळवून देणारा प्रमुख गोलंदाज संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरला. आगामी कसोटी मालिकेत बुमराह आपल्या फॉर्ममध्ये परतेल अशी आपण आशा करुया. अन्यथा टीम इंडियासाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते.