
रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ऑटो रिक्षा चोरणाऱया टोळीतील तिघांना एमएचबी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. चोरलेल्या रिक्षांचा चेसीस, इंजिन नंबर तसेच वाहन क्रमांक बदलून त्या आरोपी वापरत होते. तसेच रिक्षांची विक्रीदेखील करायचे. या तिघांकडून उत्तर मुंबईत चोरलेल्या 24 रिक्षा हस्तगत करण्यात आल्या असून गुह्याचा अधिक तपास सुरू आहे.
उत्तर मुंबईत ऑटो रिक्षा चोरीचे प्रमाण वाढल्याने अपर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, उपायुक्त दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रिक्षा चोरांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, तीन रिक्षा चोर मालवणी परिसरात राहत असल्याची खबर एमएचबी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक पंडित ठाकरे व त्यांच्या पथकाने मालवणी परिसरात कारवाई करीत रवी खारवा (35), संजय चौरसिया (38) आणि सईद अहमद अजीज उल्ला सईद या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत तिघांनी रिक्षा चोरीची कबुली दिली. त्यांनी चोरलेल्या 24 रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या. आरोपींनी बोरिवली, चारकोप, कांदिवली, समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा चोरल्याचे तपासात सांगितले. या आरोपींचे आणखी साथीदार असून पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. रिक्षा चोरल्यानंतर आरोपी तिचा इंजिन, चेसीस नंबर बदलायचे आणि त्या गाडय़ा वापरात आणायचे. काही रिक्षा त्यांनी विकल्याचेदेखील तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.




























































