
अद्ययावत सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि जागतिक पातळीवरील नवे-अत्याधुनिक उपक्रम राबवून पालिका शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के करण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मांडली. विद्यार्थी आणि शिक्षक-मुख्याध्यापक यांनी एकत्र येऊन काम केल्यास येत्या दोन-तीन वर्षांत आपण हे उद्दिष्ट साध्य करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पालिकेच्या वतीने आयोजित ‘मुख्याध्यापक सक्षमीकरण’ कार्यशाळेत ते बोलत होते. दादरमधील ‘शिवाजी नाटय़मंदिर’च्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना पालिका शाळांचा दहावीचा निकाल वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तीन टप्प्यांवर काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना अद्ययावत सुविधा देणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि क्रीडा संधी, डेंटल-मेंटल चेकअप, करीअर काऊन्सिलिंग, नवे बोर्ड, एनजीओंचे सहाय्य, नव्या भाषांचा अभ्यास अशा उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मुख्याध्यापकांना सक्षम केल्यामुळे शाळांच्या पातळीवर असणारे अनेक छोटे विषय-प्रश्न शालेय स्तरावरच सोडवले जाऊन पालिका शाळांचा गतिमान विकास होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्या दिवशी पालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागतील, लोक शिफारशी मागतील तेव्हाच आपण खासगी शाळांच्या पुढे गेलेले असू, असेही ते म्हणाले. हे उद्दिष्ट साधण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक असणारे सर्व प्रकारचे सहकार्य पालिकेला मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमप्रसंगी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, शिक्षण समिती सदस्य मंगेश सातमकर, साईनाथ दुर्गे, स्नेहल आंबेकर, प्रज्ञा भूतकर, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सहआयुक्त आशुतोष सलील, शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापकांच्या सक्षमीकरणामुळे शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना
पालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना असलेल्या अधिकारांचा परिणाम शाळेच्या विकासावर होत असतो. त्यामुळेच ‘मुख्याध्यापक सक्षमीकरण’ उपक्रमात मुख्याध्यापकांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करून त्यांना जादा अधिकार देण्यात येणार आहेत. यामध्ये तातडीच्या कामांसाठी खर्च करण्याचा अधिकार, रिक्त जागांवर तात्पुरत्या नेमणुकांचा अधिकार, डाटा एण्ट्री ऑपरेटर नेमणूक, शिस्तभंग कारवाई, रद्दी-भंगार सामानाची विल्हेवाट, छोटय़ा दुरुस्तीची कामे यासह शाळांच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आपल्या अधिकारात निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षकांना मिळणार आहेत. या उपक्रमात मुख्याध्यापकांच्या सक्षमीकरणामुळे शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी व्यक्त केला.
पालिका शाळांतील सुविधांबद्दल गौरव
पालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत 27 वस्तू, व्हर्च्युअल क्लासरूम, मोफत बसपास अशा अनेक सुविधा दिल्या जात आहेत. आता तर आयसीएसई, सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणारी मुंबई महानगरपालिका देशातील पहिली पालिका ठरली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पालिका शाळेतील जागतिक दर्जाच्या व्हर्च्युअल क्लासरूमच्या सॅटेलाइट उपक्रमातील दोघांपैकी एक मालक हा पालिका शाळेत शिकलेला असल्याचे सांगताना त्यांनी पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱया सुविधांबद्दल गौरवोद्गार काढले.
परदेशात करीअर करण्याची इच्छा असणाऱया विद्यार्थ्यांना त्या ठिकाणच्या भाषांचे ज्ञान नसल्याने ते यशस्वी होत नाहीत. म्हणूनच पालिका शाळांमध्ये मराठी, इंग्रजीनंतर फ्रेंच, जर्मनी अशा भाषा थर्ड लँग्वेज म्हणून शिकवण्याबाबत कार्यवाही करण्याचे सांगितले.
परदेशात इंजिनीयरिंगसारख्या विषयाचे शिक्षण देणाऱया संस्थांशी करार करून अत्याधुनिक अभ्यासक्रम पालिका शाळांमध्ये सुरू केल्यास पालिका शाळांतील विद्यार्थी जागतिक पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटवतील, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.




























































