
राजकीय सभा, महनीय व्यक्तींचे दौरे, कार्यक्रम असतात तेव्हा पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताचा ताण पडतो. तासन्तास उभे राहणाऱया पोलिसांना बसण्यासाठी खुर्ची नसते. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ‘राजकीय कार्यक्रमावेळी बंदोबस्तासाठी असणाऱया पोलिसांना खुर्ची मिळावी’ अशी अपेक्षा गृहमंत्र्यांना पत्राद्वारे व्यक्त केली होती. आज शरद पवार यांच्या साताऱयातील कार्यक्रमावेळी याबाबत अंमलबजावणी झाल्याचे सुखद दृश्य पाहायला मिळाले.
बंदोबस्तावरील पोलिसांनी तत्पर व सज्ज असायला हवे. पण सभा सुरळीत सुरू असताना विशेषतः महिला पोलिसांना त्रास सहन करावा लागत असतो. यामुळे अशाप्रसंगी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची, आसन उपलब्ध करणे गरजेचे वाटते. यासाठी गृह विभागाने मुभा द्यावी, असे पवार यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले होते.


























































