
शिवसेनेच्या पाठपुराव्यातून अद्ययावत यंत्रणा असलेले पालिकेचे अग्निशमन केंद्र दहिसर पश्चिम येथील कांदरपाडा येथे सुरू झाले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या अग्निशमन केंद्रामुळे दहिसर, बोरिवली आणि मागाठाणेतील 15 लाखांवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुविधा निर्माण झाली आहे.
शिवसेना उपनेते, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या पाठपुराव्यातून हे अग्निशमन केंद्र सुरू झाले आहे. या ठिकाणी सहा फायर इंजिनसह आग विझवणारी अद्ययावत यंत्रणा सज्ज असेल. तसेच अधिकारी-कर्मचारी यांची निवासस्थाने तयार केली आहेत. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी अग्निशमन दल जवानांच्या कार्याचे कौतुक केले. दहिसर परिसरातील तिवरांच्या रक्षणासाठी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी मांडलेल्या मुद्दय़ांबाबत गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, विलास पोतनीस, मनीषा चौधरी, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्षा संध्या दोशी, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, सहायक आयुक्त संध्या नांदेडकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना अग्निशमनाचे धडे द्या!
मुंबईत आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अग्निशमनाचे धडे द्या अशा सूचनाही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केल्या. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आगामी काळात अग्निशमन दलाला सक्षम करण्यासाठी मिनी फायर स्टेशन, फायर बाईक असे अद्ययावत उपक्रम राबवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.


























































