कनिष्ठ सहकार्‍याकडून झालेला अपमान सहन न झाल्याने नक्षलवाद्याचे समर्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुप्रसिद्ध नक्षलवादी दसारु केये कोल्हा याने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले आहे. कनिष्ठ सहकार्‍याकडून अपमान सहन न झाल्याने आपण आत्मसमर्पण केल्याचे कोल्हा याने सांगितले होते. कोल्हा याच्यावर पोलिसांनी साडे आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. दसारू केये कोल्हा हा नक्षलवादी चळवळीत माओवादी कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याच्याविरोधात 149 गुन्हे दाखल होते. त्यात पोलिसांवर हल्ला करणे, चकमक, निष्पाप नागरिकांच्या हत्या या सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी साडे 8 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. नक्षलवादी चळवळीत आपला अपमान झाला. तो सहन न झाल्याने आत्मसमर्पण केल्याचे कोल्हा याने सांगितले. कोल्हा म्हणाला की “प्रभाकर हा नक्षलवादी चळवळीत  दंडकारण्य भागाचा प्रमुख होता. राकेश नावाच्या कनिष्ठ सहकार्याने माझ्या विरोधात तक्रार केली. कोल्हा नेतृत्व करण्यास योग्य नाही असे त्याने प्रभाकरला सांगितले.” हा अपमान बिल्कूल सहन न झाल्याने आपण नक्षलवादाचा मार्ग सोडल्याचे कोल्हाने सांगितले.

15 जानेवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या कोल्हा AK 47 बंदूक घेऊन अबुजमाड या छत्तीसगडच्या नक्षलवादी छावणीतू पळाला. कोल्हा सलग 14 दिवस जंगलातून चालत होता. नंतर चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यात पोहोचला. पर्लकोटा नदीच्या खोर्‍यात त्याने आपली बंदूक लपवली. वरोराहून विकासपल्ली गावात त्याने आपल्या वडिलांना फोन केला आणि आत्मसपर्मण करण्याची तयारी दाखवली. कोल्हाच्या वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि आपला मुलगा आत्मसर्पण करू इच्छितो असे सांगितले. तसेच आपल्या मुलाला कुठलीच हानी पोहोचणार नाही अशी अटही घातली. पोलिसांनी अट मान्य करत कोल्हाला अटक केली आणि त्याला गडचिरोलीत आणण्यात आले.

नक्षलवादी चळवळ सोडल्याचा कोल्हा याला आनंद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवादी चळवळीत आदिवासींवर नेहमीच अन्याय केला जातो. त्यांची कधीच वरिष्ठ पदी नेमणूक केली जात नाही. आदिवासी नक्षलवाद्यांमध्ये ज्यांचे लग्न झाले आहेत अशा जोडप्यांना वेगळे ठेवले जाते. तसेच आदिवासी नक्षलवाद्यांना शहरात उपचारासाठी जाण्यास मनाई असते. उलट तेलुगु भाषिक नक्षलवाद्यांना याची परवानगी असते असे पोलिसांनी सांगितले.