कोरोनासंदर्भात पालिका मुख्यालयात विशेष समन्वय बैठक, पालिका आयुक्तांनी घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पालिका मुख्यालयात गुरुवारी पालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांची एक विशेष समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी पालिकेच्या तयारी, उपाययोजनांचा आढावा घेतला आणि तयारीचे सादरीकरण बैठकीत केले.

महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीला केंद्र सरकारकडून डॉ. खापर्डे, डा. सुळे, डॉ. गिरीश, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, पी. वेलारासू, वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, सर्व प्रमुख व उपनगरीय रुग्णालयांचे प्रतिनिधी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. संदीप भारसवाडकर तर राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, भारतीय वैद्यक संघटनेचे डॉ. अविनाश भोंडवे तसेच सर्व महापालिकांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार, महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांनी कोरोना व्हायरसच्या धर्तीवर कस्तुरबा रुग्णालयाला गुरुवारी रात्री अचानक भेट दिली. यावेळी महापौर आणि उपमहापौरांनी कस्तुरबाचे अधिष्ठाता चंद्रकांत पवार यांच्यासोबत सर्व उपाययोजना व यंत्रणांचा आढावा घेतला. मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये आणि स्वच्छतेचे सामान्य नियम पाळावेत, असे आवाहन यावेळी महापौरांनी केले.