
मुदत संपलेल्या 50 कोटी रुपये किमतीच्या डिमांड ड्राफ्टच्या नावाखाली फसवणूक करू पाहणार्या चौघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली. मनीषभाई परमार, अग्नेल नाडर, सुखात कुमार पांडा, विजय झनके, गौतम शर्मा अशी त्या पाच जणांची नावे आहेत. त्या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे एका अंधेरी परिसरातील खासगी बँकेत मॅनेजर म्हणून काम करतात. सोमवारी सकाळी ते बँकेत काम करत होते. तेव्हा त्याच्याजवळ मनीषभाई हा आला. त्याने तक्रारदारांना आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील आयसीआयसीआय बँकेची फिक्स डिपॉझिटची पावती दाखवली. ओव्हरड्राफ्टच्या आधारे कर्ज घायचे असल्याचे तक्रारदारांना सांगितले.
तक्रारदारांनी ती पावती पहिली. त्या पावतीवर असलेली सही, शिक्का हा बनावट होती. तसेच त्या डिमांड ड्राफ्टची मुदत फेब्रुवारी महिन्यातच संपल्याचे त्याच्या लक्षात आले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तक्रारदारांनी त्या चौघांना बोलण्यात गुंतवले व याची माहिती अंधेरी पोलिसांना दिली. काही वेळातच अंधेरी पोलीस घटनास्थळी आले व पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. बनावट एफडी बनवणारा हा एका खासगी बँकेच्या भाईंदर शाखेत काम करत असून त्यालाही पोलिसांनी अटक केली.
























































