
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात पुढील 15 ते 20 दिवस खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करणे योग्य नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई, पुणे आणि इतर शहरांप्रमाणे आता ग्रामीण भागातील शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. राज्यात पुढच्या काही महिन्यात निवडणुका होणार आहेत. त्या पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेला फटका बसू नये यासाठी सचिवांची बैठक घेतली. त्यांना उपाय सुचवण्यास सांगितले आहे, असेही ते म्हणाले. कोरोना झपाट्याने वाढत असल्याने सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे, तसेच उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. येत्या 15 दिवसात आपण योग्य ती काळजी घेतली तर पुढील मोठा संभाव्य धोका टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना व्हायरसचा संपूर्ण जगात प्रादुर्भाव झाला आहे. आधी कोरोनाचे संकट पुणे, पिंपरी-चिंचवडपर्यंत मर्यादीत होते. आता ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे, बस सेवा बंद करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही, असे त्यांनी सांगितले. सगळ्याच गोष्टी बंद करून चालणार नाहीत, जनतेने स्वतःहून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे ते म्हणाले. धार्मिक स्थळी गर्दी करु नका. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा. रेल्वे, बसने अनावश्यक प्रवास टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. स्वत: आपण बंधन पाळली तरी लवकरात लवकर या संकटातून बाहेर येऊ शकतो असेही ते म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आवश्यक खबरदारी आणि पावले उचलत आहे. गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, असे ते म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य दिल्याने आणि राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी रोखण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले. या क्षणी जनतेचे आरोग्य हे एकमेव प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत असेही ते म्हणाले.
एखादी व्यक्ती करोनाग्रस्त असली तरी ती गुन्हेगार नाही. तिला योग्य औषधोपचार आणि मानसिक आधारही द्या. राज्यात लागू असलेला साथरोग प्रतिबंध कायदा जनतेच्या हितासाठी असून त्यांच्यात जागृती आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोहिमा हाती घ्याव्यात. नागरिकांमध्ये भीती आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. राज्यात जे रुग्ण दाखल आहे त्यातील उपचाराला प्रतिसादही देत आहेत, असेही त्यांनी सांगितले. परदेशातून आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून 15 दिवस बाहेर पडू नये, जनतेशी संपर्क टाळावा. ज्यांना क्वॉरंटाईनमध्ये जायचे नाही, त्यांनी घरीच वेगळे राहावे. मात्र, रोगाचा प्रादुर्भाव पसरणार नाही, याची जबाबदारी घेत, योग्य त्या सूचनांचे पालन करावे, असे ते म्हणाले.



























































