
हिंदुस्थान पाकिस्तानसोबत काम करण्यासाठी मरतोय, असे म्हणत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने अकलेचे तारे तोडले आहे. हिंदुस्थानला मी कधीही वाईट मानले नाही, आणि ना दोन्ही देशांना युद्ध करायचं आहे, असे म्हणत तो पुढे म्हणाले की, हिंदुस्थान हा देश सुंदर असून तेथील लोकही प्रेमळ आहेत.
एका टीव्ही शो मध्ये बोलताना शोएब म्हणाला की, मला आई कधीही वाटले नाही की हिंदुस्थानची पाकिस्तानसोबत दुश्मनी आहे आणि त्यांना युद्ध हवे आहे. परंतु मी जेव्हा कधी टीव्ही बघतो तेव्हा असे वाटते की उद्याच युद्ध सुरू होईल. मी हिंदुस्थानमधील बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे आणि त्या देशाला खूप जवळून पाहिले आहे. आज मी हे म्हणू शकतो की हिंदुस्थान पाकिस्तानसोबत काम करण्यासाठी मरतोय, उतावळा आहे.
चीनवर आगपाखड
जगभरात कोरोना व्हायरसनेे 8000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जगभरातील या परिस्थितीला शोएबने चीनला जबाबदार धरले आहे. तुम्हाला वटवाघूळ खायची, त्याचे रक्त आणि मूत्र प्यायची काय गरज होती? असा संतापजनक सवाल शोएबने आपल्या युट्युब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओतून उठवला आहे.
तसेच यामुळे संपूर्ण जगात हा व्हायरस पसरला आहे. हो मी चायनीज लोकांबाबत बोलत आहे. त्यांनी संपूर्ण जगाला संकटात टाकले आहे. मला हे कळत नाही की तुम्ही वटवाघूळ, कुत्रे, मांजरे कसे खाऊ शकता, असा सवाल त्याने उपस्थित केला. संपूर्ण जगाला याने विळखा घातला आहे. पर्यटनाला झटका बसला आहे. अर्थव्यवस्था तोट्यात जात आहे आणि संपूर्ण दुनिया तुरुंग झाली आहे, असेही तो म्हणाला. मी चिनी लोकांविरोधात नाही, पण अशा लाईफ स्टाईल विरोधात आहे, असेही शोएब म्हणाला.





























































