
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात नाकाबंदी करणार्या पोलिस कर्मचार्यांना मारहाण केलेल्या पाच जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली. त्या टोळक्यातील चौघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, जमादार जनार्दन जाधव, दैनसिंग जोनवाल, सोहेल जफर शेख, राहुल नागलोत, राजेंद्र खरात, महिला पोलिस कर्मचारी परवीन बशीर शेख, सोनी जाधव आदी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात गुरूवारी नाकाबंदी करीत होते. त्यावेळी शेख शाहरूख शेख फारूख, शेख फारूख शेख कादर, शेख साजेद ऊर्फ अशु शेख फारूख, शेख समीर शेख सलीम व एक 14 वर्षाचा विधीसंघर्षग्रस्त हे दोन दुचाकीवर चौकात आले व त्यांनी नाकाबंदी करणार्या पोलिसांना शिवीगाळ पोलिसांच्या हातातील लाठी हिसकावून घेत पोलिसांवर हल्ला केला होता.
पोलिसांवर केलेल्या हल्यात दैनसिंग जोनवाल व जनार्दन जाधव हे दोन्ही वाहतूक शाखेचे कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पोलिसांवर हल्ला करणार्या पाचही आरोपींना ताब्यात घेतले होते. पाचही जणांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने चौघांना 13 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सहाय्यक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी बाजू मांडली.
































































