
कोरोनाचे संकट पाहता देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अशा वेळी फक्त अत्यावशक सेवा सुरू राहणार आहेत. या दरम्यान दारूची दुकाने बंद आहेत. त्यामुळे तमिळनाडूतील पाच मित्रांनी मिथेनॉल प्यायले. यात दोघांचा मृत्यू झाला असून तिघांवर उपचार सुरू आहे.
तमिळनाडूच्या कडलूर भागात पाच मित्र राहत होते. पाचही जणांना दारू पिण्याचे व्यसन होते. दररोज मिळून पाच मित्र दारू प्यायचे. त्यांच्याकडील दारूचा स्टॉक संपल्यानंतर पाचही जणांनी मिथेनॉल प्यायले. त्यामुळे सगळ्यांची तब्येत बिघडली. सर्वांना जवळाच्या रुग्णालयात दाखल केले असता दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच तिघांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचही जण एका कीटकनाशक कंपनीत काम करत होते. तिथूनच त्यांनी हे मिथेनॉल आणले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. दारू न मिळाल्याने तमिळनाडू आणि केरळमध्ये काही लोकांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तसेच तमिळनाडून दारू न मिळाल्याने एका तरुणाने आफ्टर शेव आणि तिघांनी वॉर्निश प्यायले होते. यात चारही जणांचा मृत्यू झाला होता.

























































