
परभणी शहरात गुरुवारी कोरोनाबाधीत व्यक्ती आढळून आल्याने परभणी शहर महानगरपालिकेची सर्व यंत्रणा सतर्कतेने कामाला लागली आहे. मनपाने प्रभाग समिती क्षेत्रामध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. वाहनाने किंवा पायी जाणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 15 व 4 चे स्वच्छता निरीक्षक अब्दुल शादाब, न्यायरत्न घुगे व लक्ष्मण जोगदंड, सफाई कामगार जयकुमार मकरंद यांनी मोटारसायकलने जाणाऱ्या दोन व्यक्तीना खानापुर फाटा येथे थांबवून त्यांची चौकशी केली. अमोल कैलास सदावर्ते ( वय 24) व विनोद कैलास सदावर्ते ( वय 20) ही दोन मुले पुण्याहून परभणीमार्गे पुर्णेला जात असल्याचे माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयाचे वाहन बोलावून तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच त्यांचे वाहन सानीटायझरने फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.
वसमत रोडहून पायी जाणाऱ्या किशनलाल शंकरलाल तापडीया (वय 39, रा. चाटोरी ता. पालम) यांना थांबवून विचारणा केली असता ते व्यक्ती नांदेडहून एका दुचाकीने झिरोफाटापर्यंत व त्यांनतर येथून पायी चालत परभणी येथे आल्याचे समजले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालाचे वाहन बोलावून त्यांना तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले. तसेच दोन ते तिन दिवसांपुर्वी संभीजीनगरहून परभणीत आलेले प्रा. केशव भुंजगराव चौधरी व त्यांचे जावई देशमुख यांचा आणि झरी येथून राहूल नगर परभणीत आलेल्या दोन महिलांनाही तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले.
































































