
महिनाअखेर सुरू होणाऱ्या रमजानच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने लॉकडाऊन अधिक कडक केले. रमजानमध्ये एकत्र नमाज अदा करण्यास बंदी घालण्यात आली असून अजान देण्यासही सक्त मनाई केली आहे. सहरी तसेच इफ्तारचे आयोजनही करता येणार नाही.
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन 2.0 जाहीर केले आहे. त्याचबरोबर देशातील वेगवेगळय़ा राज्य सरकारांनीही कोरोनाला रोखण्यासाठी अत्यंत कडक उपाययोजना केल्या आहेत. कर्नाटक सरकारच्या अल्पसंख्यांक विभागाने महिनाअखेर सुरू होणाऱ्या रमजानच्या पार्श्वभूमीवर काही निर्णय घेतले. यात रमजानच्या महिन्यात मशिदीत होणारी गर्दी टाळण्यासाठी एकत्र नमाज न अदा करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. घरीही नमाज अदा करताना एकत्र नमाज अदा करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर सहरी व इफ्तारीसाठी मशिदीतून वाजवण्यात येणारा सायरन आता वाजणार नाही. नमाजला येण्याचे आवाहन करणाऱ्या अजानलाही मनाई करण्यात आली आहे. मशिदीवरील भोंगे बंद करून अजान बारीक आवाजात देण्यात यावी, असे सरकारने स्पष्ट केले आहे.



























































