
‘लॉकडाऊन’मुळे अन्य उद्योगांप्रमाणेच बांधकाम व्यवसायही ठप्प झाला आहे. याचा फटका राज्यभरातील मजुर वर्गाला बसला आहे. या मजुरांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये मदत जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. राज्यातील 12 लाखांहून अधिक मजुरांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाउन आहे. या मजुरांना लॉकडाउनचे सर्काधिक चटके बसत आहेत. सध्या सगळ्या प्रकारची बांधकामं बंद आहेत. त्यामुळे या मजुरांवर बेकारीचं संकट ओढवलं आहे. अशा परिस्थितीत इतर राज्यांनीही मजुरांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारनेही मदतीचा हात या सगळ्यांना दिला आहे. राज्यातील मजुरांना आर्थिक दिलासा देता यावा म्हणून हा निर्णय सरकारने घेतला असल्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
बांधकाम मजुरांचा हक्काचा पैसा महाराष्ट्र राज्य बांधकाम मजूर मंडळात जमा आहे. जमा असलेली रक्कम 9 हजार कोटींच्या घरात आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून सेसच्या रुपाने ही रक्कम राज्य सरकारकडून घेतली जाते. त्यामुळे आता कोरोनासारखा संकट काळ समोर आलेला असताना बांधकाम मजुरांच्या खात्यात पैसे जमा केले जावे असा प्रस्ताव राज्याच्या कामगार विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला होता. त्यानुसार मदतीच्या स्वरुपात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला मुंजरी दिली असे वळसे पाटील यांनी सांगितले.

























































