चले तो चांद तक, नहीं तो रात तक! चायनीज रॅपिड टेस्ट किट भंगार, चाचण्या थांबवण्याचे ICMR चे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चायनीज वस्तू म्हणजे ‘चले तो चांद तक, नही तो रात तक’. वापरायची आणि फेकून द्यायची. चीनी वस्तूंच्या अशा दर्जाबद्दल जगाला माहिती आहे. तरीसुध्दा कोरोनासारख्या भयंकर संकटात केंद्र सरकारच्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) लाखो किट्स मागवले. पण त्या भंगार ठरल्या आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या चाचण्या त्यावर निगेटिव्ह येऊ लागल्या आहेत. त्यामुळे चाचण्या तातडीने थांबवून या किट्सचीच तपासणी करण्याची पाळी आयसीएमआरवर आली आहे.

आयसीएमआरने चीनमधून पाच लाखांपेक्षा जास्त रॅपिड टेस्ट किट्स आयात केले होते. ते कोरोना प्रभावित राज्यांमध्ये पाठवण्यात आले होते. देशात प्रथम राजस्थानमध्ये या किट्सचा वापर केला गेला. तेथील सवाई मानसिंह रुग्णालयात १०० कोरोना रुग्णांच्या या किट्सने चाचण्या केल्या गेल्या. त्यातील फक्त पाच रुग्णच पॉझिटिव्ह आढळले. योग्य प्रकारे चाचण्या केल्या गेल्या आणि किट्सही आवश्यक तापमानातच ठेवले गेले होते. त्यानंतरही चाचण्यांमध्ये तफावत आढळल्याने राजस्थानच्या आरोग्य यंत्रणेला धक्काच बसला. सरकारने यासंदर्भात आयसीएमआरकडे तक्रार केली. पश्चिम बंगालमध्येही या किट्सबद्दल असाच अनुभव आला. महाराष्ट्रात कोरोनाचे हॉट स्पॉट असलेल्या जिल्ह्यांमध्ये या किट्सद्वारे ७५ हजार नागरिकांच्या चाचण्या केल्या जाणार होत्या.

तज्ज्ञांची पथके तपासणी करणार
आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी रॅपिड टेस्ट किट्सबद्दलच्या तक्रारींना दुजोरा देतानाच पश्चिम बंगालमध्ये या किट्सचा योग्य प्रकारे वापर केला जात नसल्याची माहिती आल्याचे सांगितले. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची मान्यता असलेल्या या किट्स २० डिग्रीपेक्षा कमी तापमानात ठेवाव्या लागतात, नाहीतर निदान चुकीचे येऊ शकते असे त्यांनी सांगितले. तरीही तक्रारी आल्याने या किट्सची तपासणी करण्यासाठी आयसीएमआरच्या आठ केंद्रांमधील तज्ज्ञांची पथके पाठवली जातील, असे सांगतानाच डॉ. गंगाखेडकर यांनी, तूर्त दोन दिवस रॅपिड टेस्ट न करण्याचे निर्देश दिले आहेत.