
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एका डांबराच्या टँकरला अपघात होऊन तुंगार्लीत पलटी झाला, डांबर सगळे जमिनीवर सांडले. एक छोटी भटकी कुत्री हे डांबर क्रॉस करताना डांबरात चिटकून बसली, फक्त एका बाजूची थोडी पाठ वाचली बाकी सर्व डांबरात बुडाली, नाक थोडेफार उघडे होते म्हणून श्वास चालू होता, शिवदुर्ग रेस्क्यु टीमचे राहुल देशमुख यांना ही माहिती मिळाली, लगेचच स्वतः जाऊन पाहणी केली, व टीमला बोलवून बचाव कार्य सुरू केले.
काही वेळातच शिवदुर्ग अॅनिमल रेस्क्यु अॅम्बुलन्स पोहोचली. कुत्री डांबरातून बाहेर होती पण खूप मोठा थर त्याच्या अंगावर होता, जमिनीचा दगड गोटे, माती त्यावर चिटकून बसली होती, कुत्री आहे की नाही हे देखील दिसत नव्हते,पोत्यावर घेऊन अॅम्बुलन्सने तिला शिवदुर्ग अॅनिमल रेस्क्यु सेंटर औंढे, लोणावळा, येथे घेऊन आलो व लगेचच काम सुरू केले.
मोठमोठे चिकटलेले दगड व माती हाताने काढून घेतली, नंतर डिझेल, व खोबरे तेल याचे सम प्रमाणात मिश्रण करून घेतले. हे मिश्रण लावल्यावर डांबर निघून जाते व साईड इफेक्ट काहीही होत नाही. तोंडाचा भाग म्हणजे नाक व तोंड आधी मोकळे करायचे ठरले, नाक साफ झाल्यामुळे श्वास नीट चालू झाला, व तोंडाचे डांबर काढायला घेतले, म्हणजे त्याला खातापिता येईल. तोंड उघडायला लागल्यावर पाणी पाजले, खायला दिले, त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे त्याची शौचाची जागा साफ करणे. हे शरीरावर लागलेले डांबर काढणे इतके सोपे नव्हते, नाजूक हातानी तेल हळूहळू लावून लावून ते कमी होत होते, चार चार तास स्वयंसेवक काम करत होते, कोणी घाई केली नाही, ओढाताण केली तर आतली स्किन ओढली जायची. व फाटून जखम व्हायची व कातडी घेऊन डांबर निघायचे, कुत्री खूप ओरडायची, त्रासच व्हायचा. हे एकदा असे झाल्यावर काळजीपूर्वक काम चालू झाले, दिवसभर तेल डिझेल लावून चोळायचे व नंतर तीला बाहेर घेऊन पाण्याने धुवायचे, ज्या टेबलवर काम करत होतो तो सगळा डांबरमय झाला होता, ज्या ट्रे मध्ये तीला रात्री ठेवायचो तो तशाच अवस्थेत चिकटलेली असायचा, खुप हळूहळू काम होत होते पण कार्यकर्ते दमत नव्हते, कपडे खराब होत होते. जेवायला पण जायचे नाही कोणी. दिवसभर काम चालू असायचे, हळूहळू डांबर निघत होते, एक एक भाग मुक्त होत होता, सलग चार दिवस हे काम चालू होते. सुरवातीला गुरगुरणारी ती नंतर शांत राहून सहकार्य करीत होती, दुसऱ्या दिवशी चार पाय वेगळे झाले व ती उभी राहायला लागली, मग पळायचा प्रयत्न करायला लागली. पन डांबरामुळे पाय चिटकत होते.
हे दिवस लॉकडाऊन सुरु व्हायच्या आधीचे होते म्हणून जाऊन येऊन काम चालू होते. बरेच डांबर निघाले होते, त्यात देशात जनता कर्फ्यू जाहीर झाला, सरकारने लॉकडाऊन व त्याचे नियम अटी जाहीर केल्या. म्हणून हॉस्पिटल बंद ठेवण्यात आले पण ही डांबर कन्येचे काय करायचे हा विचार चालू झाला, वैष्णवीने तीला स्वतःच्या घरी आणले व उरलेले डांबर काढून फायनल टच दिला. तीच्या घरी असतानाच ती एकदा रात्री हातातून सटकून पळून गेली पन काही वेळाने ती परत आली.
दुसऱ्या दिवशी तीला तंगांर्लीतून ज्या भागातून आणले होते त्या भागात सोडले. डांबरामुळे पाच सहा दिवस अवघडलेली ती सोडल्यावर आनंदाने जोरात पळून गेली.
अशाप्रकारे कोणताही प्राणी अडचणीत असेल जखमी असेल तर शिवदुर्ग अॅनिमल हेल्पलाईन नंबर 75 22 946 946 यावर आवश्य कॉल करा.






















































