ज्यांना टिका करायची असेल त्यांना करु द्या, त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल; सुप्रिया सुळेंचा विरोधकांवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुठल्याही राजकीय विषयाबद्दल कुठलीही आता अस्थिरता आणणं हे अशा काळात योग्य नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई आपण कॉमन अजेंडा करुन लढली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केले आहे. आपला फोकस कामावर असला पाहिजे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगतात त्याप्रमाणे आपला फोकस कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी असायला हवा. ज्यांना टिका करायची असेल त्यांना करु द्या त्यांच्याकडे रिकामा वेळ असेल अशी मिश्किल टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. जनतेशी फेसबुकवरुन संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.

लॉकडाऊन हळूहळू कमी झाले पाहिजे असं वैयक्तिक मत मांडतानाच हे अनलॉकिंग कॅफे किंवा कॉफी डे मध्ये जाण्यासाठी नाही तर काम करुन आपण नियम व कायदे पाळू. देशाला आज कामाची गरज आहे. काम व कष्ट करून आपलं राज्य व देश उभा करण्याची वेळ आहे. नुसतं घाबरून घरात बसून आपले प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दिशा देतील. सरकार जे नियम व कायदे बनवेल त्याचे पालन करावे. हे नियम व कायदे सरकारसाठी नाही तर आपल्यासाठी आहेत हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री व माननीय दादा जो निर्णय घेतील तो निर्णय मिलिटरीच्या शिस्तीप्रमाणे पालन करा असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.

आज राज्य व देश बांधण्याची, कष्ट करण्याची, एकमेकांचे हात धरण्याची, विचारांची लढाई लढण्याची व कष्ट करण्याची वेळ आहे. राजकारण करण्याची वेळ नाही. माझ्या पक्षाचे लोक चांगलं काम करत आहेत त्यांचं कौतुक करणारे पोस्टिंग करण्याचे सरकारने नियम केल्यावर बंद केले. आज 40 दिवस झाले मी घराबाहेर पडलेली नाही. मी सरकारचे नियम तंतोतंत पाळत असल्याचेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जनतेला सांगितले.

जितक्या लवकर नियम पाळू तितक्या लवकर लॉकडाऊन उठेल तेवढ्या लवकर आर्थिक अडचणीवर मात करु शकतो. आपलं राज्य पायावर उभं कसं राहिल. आज आपल्यासमोर काम करुन आपली आर्थिक स्थिती जाग्यावर आणण्यासाठी काम केलं पाहिजे. आरोग्य व आर्थिक स्थिती यांच्यातील सुवर्णमध्य साधूनच आपल्याला पुढे जावे लागेल असे सांगतानाच आज अन्न वाटतोय पण आता त्यांना अन्न नकोय तर हाताला काम हवं आहे. शिजवून दिलेलं अन्न नकोय तर रेशन हवं आहे. दहा दिवसाचं रेशन दिलं तर ती लोकं दहा दिवस घराबाहेर पडणार नाहीत. शिवाय प्रशासनावरील ताणही कमी होईल त्यामुळे शक्यतो रेशन कीट देणंच महत्वाचं आहे असा सल्लाही सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात थुंकणे थांबवण्यासाठी एक मोहीम राबविण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले आहे. शिवाय टीबी आजारामुळे वर्षाला 15 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी सांगितली. या आजारावर उपचार आहेत तरी इतके लोक प्राण गमावत आहेत. तर दुसरीकडे कोरोनावर अजून लस आलेली नाही. एकंदरीत आरोग्याच्या बाबतीत आपण विचार करणार आहोत का असा सवालही खासदार सुप्रिया सुळे यांनी जनतेला केला.