लॉकडाऊनमध्ये प्रेयसीला भेटण्यासाठी निघाला होता प्रियकर, खेड पोलिसांनी रोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाइल फोटो

संचारबंदीचे सारे नियम पायदळी तुडवत प्रेयसीला भेटण्यासाठी नवी मुंबई (पनवेल) येथून दुचाकीने गुहागरला निघालेल्या प्रियकराला खेड पोलिसांनी कशेडी टॅप येथे अडवून माघारी धाडले. लॉकडाऊनमुळे गुहागरमध्ये अडकून पडलेल्या प्रेयसीचा विरह सहन होत नसल्याने आपण ही जोखीम पत्करली, असे या प्रेमवेड्या प्रियकराने पोलिसांना सांगितले.

कोरोना या महाभयंकर विषाणुची साखळी तोडण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरातच थांबा, घराबाहेर पडू नका, असे पोलीस प्रशासन घसा फोडून सांगत आहे. मात्र पोलिसांच्या आवाहनला आव्हान देत काही मजनू आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवण्याचें धाडस करत आहेत. दोन दिवसांपुर्वी मुंबईतील प्रियकराला सिंधूदुर्ग जिल्ह्यातील प्रेयसीसह लांजा पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाईन केले होते. ही बातमी ताजी असतानाच आज रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना गुहागर भेटायला चाललेल्या पनवेल येथील मजनूला समज देऊन परत पाठवावे लागले.

त्याचे झाले असे, नेहमीप्रमाणे खेड पोलीस सोमवारी कशेडी टॅप येथे बंदोबस्तावर होते. दरम्यान पोलादपुरकडून रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी एक दुचाकी आली. नेहमीप्रमाणे पोलिसांनी ही दुचाकी थांबवून दुचाकीस्वाराला संचारबंदी काळात वाहन चारलविण्याच्या विशेष परवान्याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांने आपल्याकडे अशा प्रकारचा कोणताही परवाना नसल्याने सांगितले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता ‘आपण पनवेल येथून आलो असून आपल्याला गुहागरला जायचे आहे’ असे त्याने पोलिसांना सांगितले. गुहागरला जाण्याचे योग्य असे काही कारण आहे का? या पोलिसांच्या प्रश्नाला त्यांने दिलेले उत्तर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आश्चर्यचकित करणारे होते.

तो म्हणाला, लॉकडाऊनमुळे माझी प्रेयसी गुहागरमध्ये अडकून पडली आहे. त्यामुळे गेले कित्येक दिवस तिला पाहता, भेटता आलेले नाही. 3 तारखेला लॉकडाऊन संपेल असे वाटले होते मात्र लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. साहजिकच मी 17 तारखेपर्यंत तिला भेटू शकत नाही. हा विरह आता सहन होण्यापलिकडचा असल्याने मी तिला भेटण्यासाठी गुहागरला निघालो आहे. कृपया माझी परिस्थिती समजून घ्या, अशी गयावया तो पोलिसांकडे करू लागला.

प्रेमात आकंऑ बुडालेल्या या प्रियकाराची विनवण्या ऐकून पोलिसांना काय करावे हे कळेनासे झाले. मात्र कर्तव्यात कसूर न करणाऱ्या पोलिसांनी त्याला जिल्ह्यात प्रवेश करण्यास नकार दिला. मात्र तरीही तो ऐकेनासे झाल्याने पोलिसांनी त्याला अखेर 14 दिवस क्वारंटाईन करण्याची तंबी दिली. पोलिसांची ही मात्रा लागू पडली आणि जिल्हाबंदीचे नियम मोडून प्रेयसीला भेटायला निघालेला प्रियकर अखेर माघारी फिरला.