
अकोला जिल्हा येथून आपल्या गावी नगर जिल्ह्यातील मढी बुद्रुक येथे आलेल्या व्यक्तीस विलगीकरण कक्षात हजर होण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी गावच्या सरपंचांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मढी बुद्रुक येथील अजय भाऊसाहेब मोकळ हे अकोला जिल्हा येथून मढी बुद्रुक येथे आले, पण याबाबत त्यांनी कोणालाही माहिती दिली नाही. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव माहीत असूनही मास्क न वापरता ते गावात इकडे तिकडे फिरत होते. तसेच त्यांना विलगीकरण कक्षात हजर होण्यास सांगितले असता, त्यांनी नकार दिला. तसेच आपण आपल्या नवीन घरातच राहण्याचा अट्टाहास धरला. याबाबत त्यांना सांगितले की, असे आपण केले तर सर्वजण असेच करतील. याचा राग येऊन घरात जाऊन कोणते तरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना रविवारी दुपारी 12.30 वाजता मढी शिवार मोकळ यांच्या घरासमोर घडली. या प्रकरणी मढी बुद्रुक येथील सरपंच संगीता बाबुराव गवळी यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
सदर फिर्यादीवरून कोपरगाव ग्रामीणमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल खटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महेश कुसारे हे करीत आहेत. दरम्यान सदर आरोपी अजय मोकळ यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.



























































