
मुंबई महानगरपालिका लॉकडाऊन काळातही पाणीपुरवठा सक्षम करण्यावर भर देत असून हाती घेतलेल्या चेंबूर-वडाळा-परळ या 9.7 किलोमीटर आणि चेंबूर ते तुर्भे या 5.5 किलोमीटर लांबीच्या दोन जलबोगद्यांचे काम वेगाने सुरू आहे. जल भोगद्यांबरोबरच पाच ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांना पर्यायी जलवाहिन्या टाकण्याचे कामही सुरू केले आहे. पालिका मुंबईकरांना दररोज सुमारे चारशे कोटी लिटर पाण्याचा पुरवठा करते.
कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक कामे सोडल्यास सर्व कामे बंद आहेत. ‘लाॅकडाउन’च्या काळातदेखील मुंबईकरांना नियमितपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्यातील अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. भविष्यातील गरजांचा अंदाज बांधून मुंबई महानगरपालिकेने या आधीच हाती घेतलेल्या चेंबूर ते वडाळा आणि वडाळा ते परळ या 9.7 किलोमीटर आणि चेंबूर ते तुर्भे या 5.5 किलोमीटर लांबीच्या दोन जलबोगद्यांचे त्याचबरोबरच पाच ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांना पर्यायी जलवाहिन्या टाकण्याचे कामही लॉकडाऊनच्या काळात वेगाने सुरू ठेवले आहे. ‘लाॅकडाउन’चा प्रतिकूल परिणाम होऊ न देता निर्धारित वेळापत्रकानुसारच ही कामे पूर्ण होतील, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्याचे (Water Supply Projects) प्रमुख अभियंता शिरिष दीक्षित यांनी दिली.
सहा विभागांचा पाणीपुरवठा सक्षम होणार
चेंबूर ते वडाळा ते परळ यादरम्यान 9.7 किलोमीटर लांबीचा व 2.5 मीटर व्यासाचा बांधण्यात येणाऱ्या जलबोगद्यामुळे भविष्यात ‘एफ उत्तर’, ‘एफ दक्षिण’ या दोन विभागांसह ‘ई’ व ‘एल’ या दोन विभागातील काही परिसरांना लाभ होणार आहे. या जलबोगद्याचे काम २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे. चेंबूर ते तुर्भे (Trombay) यादरम्यान 5.5 किलोमीटर लांबीचा व 2.5 मीटर व्यासाचा असणार आहे. या जलबोगद्यांमुळे ‘एम पूर्व’, ‘एम पश्चिम’ या दोन विभागांसह ‘इ’ व ‘एल” विभागातील काही परिसरांना लाभ होणार आहे. या जलबोगद्याचे काम २०२४ मध्ये पूर्ण होईल.
इथे सुरू आहेत पाच जलवाहिन्यांची कामे
सध्या पाच ठिकाणी पर्यायी जलवाहिन्या टाकण्याची मोठी कामे सुरू आहेत. यापैकी पहिले काम हे बाळकुम ते हजुरी पूल असे आहे. त्यांच्या लगत 4.5 किलोमीटर लांबीची व ३ मीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. हजुरी पूल ते सॅडल टनेल यादरम्यान आणि पवई ते मरोशी यादरम्यान देखील 90 वर्षे जुन्या प्रत्येकी दोन ब्रिटिशकालीन जलवाहिन्या सध्या कार्यरत आहेत. या पर्यायी जलवाहिन्यांची लांबी अनुक्रमे 4.9 किलोमीटर आणि 6.3 किलोमीटर अशी आहे. जलवाहिनी टाकण्याचे चौथे मोठे काम हे येवई ते चिंचवली यादरम्यान सुरू आहे. 4.5 किलोमीटर लांबीच्या व 3 मीटर व्यासाच्या या जलवाहिनीचे काम सध्या प्रगतीपथावर असून वैतारणा व अप्पर वैतरणा तलावातील पाणी मुंबईपर्यंत आणणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांना पर्याय म्हणून ही जलवाहिनी टाकली जात आहे. पाचवे काम हे भांडुप संकुल परिसरात सध्या सुरू आहे. जलबोगद्याने येणारे पाणी हे भांडुप संकुल परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने तब्बल 4 मीटर व्यासाची आणि एकशे पाच मीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे.
प्रवेशद्वारावर ‘सॅनिटायजिंग’ उपकरण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, संबंधित कामगारांच्या राहण्या-खाण्याची सुयोग्य व्यवस्था ही कामांच्या निकटच्या परिसरात करण्यात आली आहे. सर्व कामगारांना मास्क, हॅन्ड ग्लोव्हज नियमितपणे देण्यात येत आहेत. कामगारांच्या कामाच्या ठिकाणी व राहण्याच्या ठिकाणी नियमितपणे ‘सॅनिटायजेशन’ देखील करण्यात येत असून ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालनही काटेकोरपणे करण्यात येते. जमिनीखाली ज्या दोन ठिकाणी जलबोगद्यांची कामे सुरू आहेत, त्या दोन्ही ठिकाणी प्रवेशद्वारावर ‘सॅनिटायजिंग’ उपकरण बसविण्यात आले आहे.




























































