
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. आंबा वाहतुकीसाठी मुंबईसारख्या हॉटस्पॉट ठिकाणी गेलेल्या एका वाहन चालकाचा नमूना कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून वेंगुर्ले तालुक्यातील ही व्यक्ती आहे. यामुळे त्याचा गाव परिसर कन्टेंटमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु करण्यात आला आहे.
याबाबतचा अहवाल मंगळवारी सायंकाळी उशिरा आला. त्यामुळे प्रशासनात खळबळ माजली. ही व्यक्ती मुंबई येथे आंबा वाहतूक करून घेवून गेली होती. वाहन चालक असलेली ही व्यक्ती 27 एप्रिल रोजी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांना यंत्रणेने संस्थात्मक क्वारंटाइन केले होते. 2 मे रोजी त्यांचा स्राव घेवून मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाला. ही व्यक्ती वेंगुर्ले तालुक्यातील ज्या गावातील आहे, तो गाव कन्टेंटमेंट झोन म्हणून आरोग्य यंत्रणेने जाहिर केला आहे. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरु करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या नातेवाइकांना आयसोलेशन किंवा संस्थात्मक क्वारंटाइन करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात एकूण 488 व्यक्ती क्वारंटाइन असून त्यापैकी 323 व्यक्तींना होम क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. तर 165 व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत एकूण 566 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी 518 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 48 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. आयसोलेशन कक्षामध्ये आजमितीस 67 व्यक्ती दाखल आहेत. त्यापैकी 30 रुग्ण हे विशेष कोविड रुग्णालयात दाखल असून 37 रुग्ण हे विशेष कोविड आरोग्य केंद्रामध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज दिवसभरात 4 हजार 584 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांवर उपचार सुरु
जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण 26 मार्च रोजी मिळाला होता. त्याची दूसरी व तिसरी चाचणी 3 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह येत तो कोरोना मुक्त होवून 9 एप्रिल रोजी घरी गेला होता. त्यानंतर एकही रुग्ण न मिळाल्याने ग्रीन झोनमध्ये प्रवेश करण्यास जिल्ह्याला अवघे तीन दिवस शिल्लक असताना 29 एप्रिल रोजी दूसरा कोरोना बाधित रुग्ण मिळाला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना अवघ्या 7 दिवसांत तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. त्यामुळे सध्या जिल्हा रुग्णालयात दोन व्यक्तींवर कोरोना उपचार सुरु आहेत.
तिसऱ्या रुग्णामुळे आंबा वाहतूक अडचणीत?
जिल्ह्यात उत्पादित झालेला आंबा वाहतूक करून मुंबई, पुणे सारख्या रेड झोन ठिकाणी नेणाऱ्या व्यक्ती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. या व्यक्तींची वेळोवेळी तपासणी करण्याची मागणी होत होती. जिल्ह्यात तिसरा मिळालेला वेंगुर्ले तालुक्यातील कोरोना रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री ही आंबा वाहतूक अशी आहे. तो मुंबई येथे आंबा पेट्या भरलेले वाहन घेवून मुंबई येथे गेले होते. यामुळे आता जिल्ह्यातील आंबा वाहतूक अडचणीत येण्याची शक्यता आहे.


























































