बीडमध्ये जयदत्त क्षीरसागरांची मोलाची मदत, 15 हजार कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या लढाईत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या 15 हजार सामान्य कुटुंबांना एक महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप घरी पोहोचवले जात आहे. कोरोनाच्या संकटात क्षीरसागराची ही मदत लाखमोलाची ठरणार आहे. कारण अनेक दानशूर व्यक्तींनी केलेली मदत संपुष्टात येत असताना ही मदत त्यांच्या कामाला येणार आहे.

आज बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कोरोनाच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी अत्यंत गरीब कुटुंबांना आधार देण्याचे काम केले. भयावह परिस्थितीमध्ये मदतीचा हात पुढे करत बीड मतदार संघातील 15 हजार कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूची किट वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांपासून हजारो कामगार, मजूर, सामान्य कुटूंब घरामध्ये बसून आहे, हाताला काम नाही अन पोट हातावरचे अशा परिस्थिती मध्ये बीड मधील दातृत्व असणारे अनेक हात मदती साठी पुढे आले. प्रत्येक जण एकमेकाला या कठीण परिस्थितीमध्ये मदतीचा आधार देत होता. गेली 50 दिवस या मदतीवरच हजारो कुटूंब आपला उदरनिर्वाह भागवत होते मात्र पुन्हा लॉकडाऊन वाढल्याने आता काय खायचे अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली होती, अशा बिकट परिस्थिती मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 15 हजार अत्यंत गरीब आणि सामान्य कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूचे वाटप प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले. मतदार संघातील 13 ठिकाणी डेपो तयार करून गावागावात मदत पोहोचती केली.

मुख्यमंत्री सहाय्यतासाठी हा निधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. राज्यभर मोठा प्रतिसाद देत सामान्य नागरिकांनीही यासाठी मदत केली, बीड मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या विविध संस्थेच्या माध्यमातून 10 लाख 500 रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे सुपूर्द केला होता, या पुढे ही सामान्य नागरिकांना मदतीचा ओघ सुरूच राहील, असे म्हणत घरा बाहेर पडू नका, सरकारच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.