चंद्रपूर – बिबट्या पाठोपाठ वाघिणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी बिबट्या पाठोपाठ वाघीण मृतावस्थेत सापडल्यानं वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीतारामपेठ जंगलात ही वाघीण आज दिसून आली. हा परिसर ताडोबाच्या बफर क्षेत्रात येतो. पूर्ण वाढ झालेली ही वाघीण असून, तिचं शव पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत आहे. त्यामुळं किमान दोन ते तीन दिवसांपूर्वीच ती मृत्युमुखी पडली असावी, असा अंदाज आहे.

या वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहेत. त्यामुळं शिकारीची शक्यता कमी आहे. माहिती मिळताच ताडोबाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन केल्यावरच कळू शकेल. आज सकाळीच सावली इथं फाशात अडकून एक बिबट्या मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर काही तासातच ही घटना उघड झाल्यानं वनविभाग चांगलाच हादरला आहे.