शरद पवार माझ्या वडिलांसारखे – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरद पवार माझ्या वडिलांसारखे आहेत असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. कोकण दौऱ्यावर असताना एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

निसर्ग वादळाचा सर्वाधिक फटका कोकण विभागाला बसला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी कोकण दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. याचवेळी देवेंद्र फडणवीसही कोकण दौऱ्यावर आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले होते की, ‘अनेक लोक वेगवेगळ्या भागातून येतात. मी बारामती सारख्या दुष्काळी भागातून येतो. फडणवीस नागपूरचे असून तिथे समुद्र नाही. या दौऱ्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल.’

यासंदर्भात विचारले असता टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘शरद पवार माझ्या वडिलांसारखे आहेत. माझे वडील असते तर त्यांच्याच वयाचे असते. प्रत्येकाच्या वडिलांना असे वाटते की मुलाला आपल्यापेक्षा कमी कळतं. मुलगा कितीही पुढे गेला तरी वडिलांची हीच भावना असते, याच भावनेतून पवार साहेब बोलले असावे,’ असे फडणवीस म्हणाले.

निसर्ग वादळामुळे कोकणला फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगडसाठी 100 कोटी, रत्नागिरीला 75 कोटी आणि सिंधुदूर्गला 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला देण्यात आल्या होत्या. या बदललेल्या निकषांप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.