
कोयत्याने वार करून हॉटेल व्यवसायिकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नऱ्हेत घडली आहे. त्यानंतर सिंहगड पोलिसांनी ताताडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. सुनील लांगोरे (वय – 40) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील यांचे नऱ्हे भागात एका सोसायटीसमोर हॉटेल असून त्याठिकाणी चहा आणि नाष्टा मिळतो. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुनील हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी हातात कोयते घेऊन आलेल्या दोघांनी त्यांच्यावर वार केले. त्यामुळे सुनील रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सिहंगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हॉटेल व्यवसायिक सुनील यांचा खून झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचा खून कोणी केला, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सिंहगड पोलिस अधिक तपास करीत आहेत.




























































