
मजा येते म्हणून दोन अल्पवयीनांचे खून करणाऱ्या एका विकृताला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. हा विकृत आरोपी आपल्या भावाला मारण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला अटक करण्यात आली.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राधेश्याम असं या आरोपीचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात धरमपूर येथे तो राहतो. 11 जून रोजी राधेश्यामला त्याचा मोठा भाऊ विश्वनाथ याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. सुदैवाने त्याला या हल्ल्यात फारशी इजा झाली नाही. पण, यावेळी झालेल्या आवाजामुळे त्यांच्या घरातील सदस्य जागे झाले. त्यांनी राधेश्यामला अडवून पकडलं आणि त्याला पोलिसांच्या हवाली केलं.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक सत्य उघड झालं. त्याने यापूर्वी दोन खून केल्याचं कबूल केलं. ते दोन्ही खून त्याच्या पुतण्यांचे होते. सत्येंद्र (5) आणि प्रशांत (5) या आपल्याच पुतण्यांची त्याने हत्या केली होती. मात्र, या प्रकरणांमध्ये पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नव्हते. सत्येंद्रच्या हत्येच्या आरोपावरून एका महिलेसह तीन जणांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आलं होतं.
जेव्हा राधेश्यामला या हत्यांमागचा हेतू विचारला गेला, तेव्हा राधेश्यामने दिलेलं उत्तर अंगावर शहारे आणणारं होतं. त्याच्या जबाबानुसार, त्याला खून करण्याने आनंद मिळत होता. त्यात मजा वाटत होती. म्हणून तो खून करत होता. भावानंतर अजून दोन जणांना मारण्याचाही त्याचा विचार होता, असं राधेश्यामने कबूल केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


























































