दारूबंदी असूनही चंद्रपूरात मिळते दारू, तस्करांवर कारवाई करण्याची आमदार जोरगेवार यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur

कोरोना संकटकाळात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत. असे असतानाही दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू येते कशी, असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला आहे. तिसऱ्या लॉकडाऊनपर्यंत जिल्ह्यात दारूचा पुरवठा जवळपास बंद झाला होता. मात्र त्यानंतर व्यवहारात थोडी शिथिलता मिळताच चंद्रपूर जिल्ह्यात दारूचा महापूर सुरू झाला आहे. अवैध विक्रेते मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाले असून एका उपनिरीक्षकाला मारहाणही झाली होती.

जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस तळ ठोकून आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अधिकृत परवानगी घ्यावी लागते. एवढी तगडी व्यवस्था असताना दारू मात्र बिनबोभाट कशी येते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात पाचपट अधिक दराने दारू विकली जात आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. ही गंभीर स्थिती लक्षात घेऊन चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि यावर आळा घालण्याची मागणी केली.

काही प्रभावशाली राजकारण्यांच्या दबावामुळेही दारू पकडली जात नसल्याचा आरोप होतोय. जिल्ह्यातील विविध भाग तस्करांना वाटून देण्यात आल्याचाही आरोप होत आहे. हे चित्र योग्य नाही. त्यामुळं अशा तस्करांवर कारवाई व्हावी अशी मागणी जोरगेवार यांनी केली आहे.