
मुंबईत गेल्या एकाच दिवसांत 1128 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 तासांत 628 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे एकूण कोरोनामुक्त होणार्यांचा आकडा 34 हजार 119 वर पोहोचला आहे.
पालिकेने सोमवारी दिलेल्या मृतांच्या एकूण आकडेवारीत 19 जूनपूर्वीच्या 46 मृत्यूंचा समावेश असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 3735 झाली आहे. या 66 मृतांमध्ये 41 पुरुष आणि 25 महिलांचा समावेश आहे. यातील 40 जणांना काही दीर्घकालीन आजार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. नव्या रुग्णांमुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या आता 67 हजार 635 झाली आहे. मात्र यातील 34 हजार 119 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असल्यामुळे मुंबईत आता 29 हजार 781 कोरोना अॅक्टिव्ह केसेस असल्याचेही पालिकेने जाहीर केले आहे.





























































