
आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठनिवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका व प्रतिमा घेवून विठुमाऊलीचा जयघोष करीत विश्वस्तांसह वीसजण शिवशाही बसने मंगळवारी पंढरपूरकडे रवाना झाले. नऊ तासांचा हा प्रवास आहे. बुधवारी आषाढी एकादशीला नगर परिक्रमा होईल अन् निवृत्तीनाथ विठुमाऊलीची भेट घेतील म्हणजे आपल्यालाच दर्शन घडेल या भक्तीभावाने मनोमनी हजारो वारकर्यांनी आपापल्या घरातच राहून ही वारी अनुभवली.
दरवर्षी मोठ्या भक्तीमय वातावरणात हजारो वारकरी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी संत निवृत्तीनाथांच्या पालखी रथासोबत वारी करतात. नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा दिंडी सोहळा रद्द झाल्याने सर्वांचीच ही चैतन्याची वारी चुकली. त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठनिवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिरात आज सकाळी विधीवत पूजा, भजन, आरती झाली. त्यानंतर निवृत्तीनाथांच्या चांदीच्या पादुका व प्रतिमा घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात विश्वस्त, पुजारी, टाळकरी, मानकरी, झेंडेकरी आणि विणेकरी हे कुशावर्तावर पोहचले. तेथे पादुकांचे स्नान व पूजा होवून पायी चालत या मोजक्या वारकर्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. तेथून पुढे निवृत्ती नाथांच्या पादुकांचा प्रवास शिवशाही बसने सुरू झाला. ही शिवशाही बस पंढरपूरच्या प्रदक्षिणा मार्गावरील श्री निवृत्तीनाथ मठात मुक्कामी थांबणार आहे. बुधवारी चंद्रभागेत स्नान,नगर परिक्रमा आणि द्वादशीला दर्शन घेवून परतीचा प्रवास सुरू होईल, अशी माहिती पुजारी योगेश गोसावी यांनी दिली.
देवाचे सारथ्य केले
वारकरी संप्रदायाच्या इतिहासात प्रथमच संत निवृत्तीनाथांच्या पादुका शिवशाही बसने मार्गस्थ झाल्या. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हे सुमारे चारशे किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी आठ ते नऊ तासांचा वेळ लागेल. आतापर्यंत आषाढीनिमित्त हजारो वारकर्यांना आम्ही पंढरपुरी सुखरूप पोहचविले. यंदा प्रथमच देवाचे सारथ्य करण्याचे भाग्य लाभले याचा आनंद आहे, अशी भावना ‘शिवशाही’च्या दोन्ही चालकांनी व्यक्त केली.



























































