खेड- नारिंगी नदीला आलेल्या पुरामध्ये अडकलेल्या चाळीस शेतकऱ्यांची सुखरुप सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंचघर आणि चाकाळे गावांच्या मधून वाहणाऱ्या नारिंगी नदीला अचानक पुर आल्याने शेतात लावणी करायला गेलेले सुमारे 80 शेतकरी अडकून पडले. गावातील धाडसी युवकांनी प्राणाची बाजी लावत मानवी साखळी तयार करून पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शेतीची रोपे आणि काही नांगर वाहन गेले. सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही.

शुक्रवार दुपारपासून कोकणात पावसाचा जोर वाढला असल्याने शेतकरी लावणीच्या कामात गुंतले आहेत. शहरापासून जवळच असलेल्या चाकाळे गावातील अनेक शेतकरी नारिंगी नदीच्या किनारी असलेल्या शेतांमध्ये लावणी करत होते. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास नदीने उग्र रुप धारण केले आणि बघता बघता नदीचे पाणी शेतात घुसले. त्यामुळे शेतातलावणी करत असलेले शेतकरी शेताच्या बांधावरच अडकून पडले. पावसाचा जोर कायम असल्याने नदीचे पाणी क्षणाक्षणाला वाढत होते तसतसा शेतकऱ्यांचा धीर सुटत होता. विशेष करून महिलांची अवस्था अतिशय दयनिय झाली होती. अचानक उद्धभवलेल्या या धोक्यातून आपली सुटका नाही हे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरडा करायला सुरवात केली.

नारिंगी नदीकिनारी लावणी करण्यासाठी गेलेले शेतकरी पुराच्या पाण्यात अडकले असल्याची माहिती मिळताच गावातील तरुणांनी तात्काळ नारिंगी नदीच्या किनारी धाव घेतली. नदीने धारण केले उग्र रुप आणि त्यामध्ये अडकून पडलेले हतबल शेतकरी पाहून मदतीसाठी पोहकलेल्या युवकांचाही श्वास कोंडला, मात्र गावातील जांबाज युवकांनी क्षणाचाही विलंब न करता मानवी साखळी तयार करत दोरखंडाच्या साहाय्याने पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या शेतकऱ्यांची सुखरूप सुटका केली. हे रेस्क्यू ऑपरेशन सुमारे तासभर सुरू होते. या घटनेत शेतीतील लावणीसाठी काढण्यात आलेली रोपे आणि काही नांगर वाहून गेले. वेळेत मदत मिळाल्याने मनुष्यहानी टळली. अन्यथा कालच्या शनिवारची खेड तालुक्याच्या इतिहासात काळा शनिवार अशी नोंद झाली असती. या आधी अशी परिस्थिती निर्माण झाली होती का? असे येथील शेतकऱ्यांना विचारले असता या आधी अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नसल्याचे सांगण्यात आले.