
जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्यावतीने 30 जून रोजी एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे “अनुवाद ” या विषयावर झूम ॲपवर आयोजन करण्यात आले होते. इंग्रजीच्या प्राध्यापक डॉ. अलका नाथ्रेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने त्यांना हा कार्यक्रम समर्पित केलेला होता.
महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग प्रमुख समन्वयक डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी वेबिनार आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या की, गेल्या काही वर्षात अनुवादाला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे याविषयी सांगोपांग शास्त्रीय चर्चा होणे अपेक्षित होते. डॉ. अलका नाथ्रेकर या इंग्रजी साहित्याच्या गाढ्या अभ्यासक आहेत. भाषांतर हा त्यांचा आवडीचा प्रांत असल्यामुळे या विषयावरच वेबिनार ठेवला गेला.
विषेश म्हणजे मल्याळम साहित्य अकादमीचे प्रा. इ व्ही रामकृष्णन, उर्दू साहित्य अकादमीचे प्रा. ए जी खान व प्रा. अलका नाथ्रेकर मराठी साहित्य अकादमीचे ख्यातिप्राप्त लेखकांचा त्रिवेणी संगम या कार्यक्रमात जुळून आला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ उत्तम अंभोरे प्रसिद्ध अनुवादक असल्याने अशी वैचारिक मेजवानी देशभरातील इंग्रजीच्या आणि अनुवाद क्षेत्रात काम करणार्या अभ्यासकांना उपलब्ध झाली.
डॉ. नाथ्रेकर यांनी साहित्य अकादमीसाठी मृगरेखा हा मराठीत अनुवाद केला. त्यबद्दल आणि एकंदर अनुवादित साहित्य यावर चर्चा केली. आपल्या गुरूंच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवरील भाषांतर या विषयावर वेबिनारचे आयोजन करून एक आयुष्यभर संस्मरणीय राहील अशी एक अमोल भेट आपल्या गुरुस देऊन अभ्यासकांसाठीही ज्ञानाची एक पर्वणी या निमित्ताने राष्ट्रमाता महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली.
प्रसिद्ध मल्याळम साहित्यिक व इंग्रजीचे गाढे अभ्यासक प्रा. ई. व्ही. रामकृष्णन यांनी आपल्या बीजभाषणात भाषांतराचा सुरुवातीपासून आढावा घेतला. यामध्ये भाषांतरातील विविध सांस्कृतिक प्रवाह, भाषांतराचे विविध पैलू, जागतिक साहित्य व भाषांतर, स्वातंत्र्योत्तर भाषांतराच्या प्रवाहावर सोदाहरण ऊहापोह केला. परदेश पर्यटन व भाषांतर याचा गाढा संबंध असतो असे ते म्हणाले. देशातील अमोल साहित्यकृतीचे भाषांतर हे इंग्रजीमध्ये झाल्यामुळे भारतीय साहित्य हे जगप्रसिद्ध होऊ शकले.
उर्दू साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त डॉ. अफजल खान यांनी आपल्या व्याख्यानातून मराठवाड्यातील भाषांतर चळवळीचा लेखाजोखा सादर केला. भाषांतराचे सिद्धांत, भाषांतराचा अभ्यास, मर्यादा, बांधीलकी व संधी यावर अनेक उदाहरणे देत प्रकाश टाकला. डॉ. खान यांनी नुकतेच श्यामची आई या मराठी साहित्यकृतीचे उर्दूमध्ये भाषांतर केले आहेत.
डॉ. अलका नाथ्रेकर यांनी आपल्या मनोगतामधून आपली झालेली जडणघडण मांडली. याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. शैलजा चांदुरकर आणि त्यांची बहीण डॉ. संध्या नाथ्रेकर, यांनी काही आठवणी सांगितल्या.
प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके यांनी या वेबीनारचा अध्यक्षीय समारोप केला. प्रा. विठ्ठल गाडेकर यांनी ऑनलाइन वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या साहित्यप्रेमींचे आभार मानले.वेबिनार मध्ये देशभरातील ख्यातिप्राप्त अभ्यासक साहित्य प्रेमींनी उपस्थिती दर्शवली. अत्यंत दर्जेदार वेबिनार बद्दल महाविद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कोविड-19 मुळे निर्माण झालेली मरगळ यानिमित्ताने दूर लोटली व चैतन्य आणि नविन ज्ञानाचे भांडार सहभागी लोकांना मिळाले. देशभरातून मोठा प्रतिसाद या वेबिनारला मिळाला हे विशेष उल्लेखनीय ठरले तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक, नागरिक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉ. नाथ्रेकर यांचे माजी विद्यार्थी, तसेच साहित्यप्रेमी यामध्ये सहभागी झाले होते.



























































