सामना अग्रलेख – या आनंदवार्ता नाहीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जोर लावावा लागेल. कोरोनाचा पाठलाग करावा लागेल. जास्तीत जास्त लोकांना क्वारंटाइन करण्याची सज्जता ठेवावी लागेल. ठाण्यातील आकडा 15 हजारांवर गेलाय व रोज चारशे-पाचशे रुग्ण सापडत आहेत. अमेरिकेत कालच्या चोवीस तासांत 70 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले. अमेरिकेच्या मानाने आपण या आकडेबाजीत मागे आहोत. ठाण्याच्या तुलनेत मुंबईचे संक्रमण कमी झाले या बातम्या काही आनंदोत्सवाच्या नाहीत. ठाणे व बाजूची सर्व शहरे मुंबईचाच भाग आहेत हे विसरता येणार नाही.

गेल्या तीस दिवसांत देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 3 हजार 817 ने म्हणजे दुपटीने वाढली. चोवीस तासांतच 30 हजार रुग्ण वाढले. मृतांची संख्यादेखील वाढते आहे. हे चित्र काही चांगले नाही. हे चित्र संपूर्ण देशाचेच आहे व ते दिवसेंदिवस अधिकच गंभीर होईल असे वाटते. कोरोनाची लढाई महाभारतापेक्षा मोठी आहे. हे जणू तिसरे महायुद्धच सुरू झाले आहे. हिंदुस्थानसारख्या ‘गर्दी’च्या देशात वारंवार लॉकडाऊन करावे लागत आहे व असे लॉकडाऊन करूनही गुण येत नाही. मुंबईसारख्या शहराचे बोलायचे तर पालिका आयुक्त श्री. चहल यांनी सांगितले, मुंबईतला कोरोना आता नियंत्रणात आला आहे व लवकरच तो जास्त प्रमाणात आटोक्यात येईल. ही आशादायी गोष्ट आहे. मुंबईत सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱया अमिताभ बच्चन व त्यांच्या परिवारास कोरोनाची लागण झाली. बच्चन यांच्या तीनही बंगल्यांत कोरोना घुसू नये म्हणून सर्व यंत्रणा लावली होती. तरीही कोरोना घुसलाच. महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची दुःखद बातमी आली आहे. श्रीमती सत्यनारायण या गर्दीत मिसळत नव्हत्या व स्वतःची काळजी घेण्याइतक्या सक्षम होत्या. गेल्या काही दिवसांत सामान्य लोकांबरोबर असे अनेक महत्त्वाचे लोक आपण गमावले आहेत. पोलीस अंमलदार, पालिका अधिकारी, डॉक्टर मंडळींनी कोरोनाशी लढताना आपला देह ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर

मुंबईत कोरोना नियंत्रणात

आला आहे ही बातमी आनंदाचीच आहे, पण रोज हजारावर नवे रुग्ण कोरोनाग्रस्त होत आहेत. महिनाभरापूर्वी रोज दोनेक हजार रुग्ण आढळत, ते आता हजार-पंधराशेवर आले. मुंबई नियंत्रणात असून काय उपयोग? मुंबईस जोडलेले ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई, नालासोपारा हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत. बाजूचे रायगड, पुणे, पिंपरी-चिंचवड वाढत्या कोरोनामुळे पुन्हा ‘लॉकडाऊन’ झाले. म्हणजे लॉकडाऊन लावणे व काढणे असा खो-खो, आटय़ापाटय़ांचा खेळ वाढत चालला आहे. सोलापूर, कोल्हापूरसारखे जिल्हेही कोरोनाने बेजार आहेत. म्हणजे महाराष्ट्रासारखे राज्य हे कोरोनाशी झुंज देत आहे. एकटय़ा मराठवाडय़ातच कोरोनाचे आतापर्यंत पाचशे बळी गेले. सांगलीच्या परिसरात रेकॉर्डब्रेक कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सर्व काही आलबेल आहे असा दावा करणे चुकीचे आहे. सरकार प्रयत्न वगैरे करीत आहे. खाटा, आयसीयू, व्हेंटिलेटरची व्यवस्था करीत आहे. तरीही अनेक ठिकाणी व्हेंटिलेटरअभावी जे बळी जात आहेत त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? पुण्यातील एक वैज्ञानिक लक्ष्मीनारायण व्हेंटिलेटर वेळेत उपलब्ध झाले नाही म्हणून मरण पावले. या वार्ता धक्कादायक व व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱया आहेत. ‘चेस द व्हायरस’ ही संकल्पना वाईट नाही व अनेक ठिकाणी ती राबवली. सांगलीत सुरुवातीला कोरोना शून्य झाला, पण ‘चेस द व्हायरस’ म्हणजे संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी टेस्टिंग आणि

संशयित रुग्णांचा शोध

म्हणजे ट्रेसिंग करण्याच्या पद्धतीमुळे. चेसिंग, टेस्टिंग आणि ट्रेसिंग ही पद्धत आता वापरली जात आहे. जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्यात. दुसरे म्हणजे काही झाले तरी रुग्णांचा व मृतांचा आकडा लपवू नका. त्यामुळे युद्ध किती गंभीर आहे ते कळणार नाही. राज्यात आतापर्यंत 103 तपासणी प्रयोगशाळांची उभारणी झाली व सरकारी यंत्रणा मैदानावर आहे. तरीही कोरोनाचा कहर थांबत नाही. ठाण्याचाच विचार केला तर ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 25 लाखांच्या आसपास आहे व रोज साडेतीन हजार टेस्टिंगचं लक्ष्य ठेवले आहे. ठाणे, मुंबई, डोंबिवली, कल्याण ही जुळी शहरे आहेत. नवी मुंबईचेदेखील तसेच आहे. रोज येणे-जाणे आहे. त्यामुळे या जुळय़ा शहरांचे कोरोना संक्रमणाचे खापर एकावर फोडता येणार नाही. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जोर लावावा लागेल. कोरोनाचा पाठलाग करावा लागेल. जास्तीत जास्त लोकांना क्वारंटाइन करण्याची सज्जता ठेवावी लागेल. ठाण्यातील आकडा 15 हजारांवर गेलाय व रोज चारशे-पाचशे रुग्ण सापडत आहेत. नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, पुणे शहरांचे पालिका आयुक्त बदलले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणास ‘ब्रेक’ लागेल असे प्रशासनाला वाटत असेल तर त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. अमेरिकेत कालच्या चोवीस तासांत 70 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले. अमेरिकेच्या मानाने आपण या आकडेबाजीत मागे आहोत. ठाण्याच्या तुलनेत मुंबईचे संक्रमण कमी झाले या बातम्या काही आनंदोत्सवाच्या नाहीत. ठाणे व बाजूची सर्व शहरे मुंबईचाच भाग आहेत हे विसरता येणार नाही.