संस्कृती सोहळा – सौंदर्यमग्न श्रावण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भूतलावर स्वर्ग पाहायचा असेल तर श्रावणात निसर्गाला गाठावे. श्रावणात हिरवळीसारखाच हिरवा हर्ष मनात दाटलेला असतो. श्रावण म्हणजे निसर्गाचं मनमोहक रूपच. आपल्या सणउत्सवांना श्रावणापासूनच सुरुवात होते. श्रावण म्हणजे मांगल्याचे प्रतीक असेच त्याचे वर्णन करता येईल.

पाऊस पडून गेल्यावर धरणी चिंब भिजून जाते. ‘पाणी पिऊनिया रानं तृप्त झाली, हिरवा शालू नेसुनी वसुंधरा साज सजली’. वसुंधरा नटूनथटून नववधूसारखी भासत आहे. हिरव्या पाचूच्या दागिन्यांनी ती मढली आहे. केसांत रंगीबेरंगी फुलांचा गजरा माळला आहे. असा सुखसोहळा श्रावणमासात साजरा होतो. श्रावण महिना म्हणजे निसर्गातील पवित्र ऋतू, सणांची रेलचेल, पूजापाठ, उपवास, आरत्या, व्रतवैकल्ये! असे वातावरण सर्वांनाच प्रसन्न ठेवते. ‘हिरवे हिरवे गाल गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ असे श्रावणाचे वर्णन बालकवींनी केले आहे. निसर्गातील सतेजपणा, पानांची कोवळीक सळसळ, फुलांचे बहरणे, झऱयांची खळखळ अशा वातावरणात श्रावण आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून देतो. श्रावणात अनेक ऋषीमुनींनी साधना केली असावी. कित्येक पवित्र आणि मंगलमय कार्यं श्रावणात केली जातात.

निसर्गाचे मनोहारी रूप न्याहाळावे ते श्रावणातच. डोंगरमाथ्यावर कृष्णवर्णीय मेघांची दाटी झालेली, पावसाचे वातावरण आणि कुठून लबाड वारा येतो आणि ढगांना दूरवर पिटाळत पुन्हा क्षितिजावर येतो… आणि पुन्हा खेळ सुरू होतो…. ऊन-पावसाचा. क्षितिजावर सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मखर उभारून प्रकाशकिरणांची जादूगिरी सुरू असते. भूतलावर स्वर्ग पाहायचा असेल तर श्रावणात निसर्गाला गाठावे. जरा थांबून त्याच्याशी चार गुजगोष्टी कराव्यात. जीवनातील संकटावर मात करण्याचे सामर्थ्य अंगी येईल. शांत तळय़ाकाठी हिरवी झाडी, क्षितिजावर निळय़ा-जांभळय़ा रंगांची दाटी, दरीत पडणारे धबधब्याचे दुधासारखे जल, पाण्याचा रोरावणारा आवाज, नदीतील पाण्याला आलेला खळाळणारा वेग… हे सर्व अद्भुत निसर्गाचे विलोभनीय रूप आपल्याला नक्कीच मोहवून टाकते. सृष्टीच्या या खेळातून सर्वांग प्रफुल्लीत होते. अंगात नवीन, सकारात्मक विचारांचा प्रवाह वाहतो. जणू अंगी धबधबा कोसळत असतो. चैतन्य वाहत असते.

मन वेडे पावसात चिंब न्हाते,
फुलांचे गंधाळणे मज धुंद करते!

…असे चिंब भिजलेले मन… अन् सोबतीला फुलांचा हळुवार गंध. त्या शीतल वाऱयाच्या लहरी अंगाअंगावर रोमांच निर्माण करतात आणि मी श्रावणातील झाडावर झोके घेतो. अशा श्रावणात मनही चिंब भिजलेले असते. हे सखे, तू या जीवनाच्या प्रवाहात साथ दे. सुख/अमृताची बरसात कर, असे मन प्रियेला सांगण्यास आतुरले आहे.

ऋतूंचा राजा श्रावण तुझी वाट पाहत आहे. तलावात डुंबत असलेले राजहंस, कमळेही फुलली आहेत. मंदिराशेजारील औदुंबर साधनेत मग्न आहे. फुलांना घाई दत्तात्रयांच्या पायाशी जाण्याची. आता पाखरांनी आराधना करण्यास सुरुवात केली आहे. माहेराला आलेल्या पोरी-बाळी सासर विसरून झिम्मा-फुगडी खेळण्यात मग्न आहेत. त्यांच्यासाठी निसर्गाने एवढी आरास केली आहे. वारुळातील नागोबादादा लाह्यांची वाट पाहत आहे आणि लहान मुलं ओलंचिंब होऊन गीत गात आहेत-

हिंडत, हुंदडत फिरू चला,
आला श्रावण भिजू चला
रंगीबेरंगी दुनियेत या
हिरवळीवर खेळू चला
सोबत घेऊन पाऊस थेंब
पाठशिवणी खेळू चला
दमून भागून गेल्यावर
निर्झरात त्या नाचू चला
धुंद होऊन गाऊ चला
आला श्रावण भिजू चला….

आणि… असा लोभस श्रावण सजूनधजून आपल्या स्वागतासाठी तयार आहे.