
बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या 24 तासात 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी पहाटे आलेल्या अहवालांमध्ये 14 जणांचाही त्यात समावेश आहे. तर दिवसभरामध्ये बीड जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये एका दिवसात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या गेवराई तालुक्यातील केकतपांगरी येथील रहिवाशी असलेल्या एका रुग्णाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. तर बीड शहरातील राजीव नगर या ठिकाणचा एक तरूण कोरोनाबाधित असून तो संभाजीनगर येथे उपचार घेत होता. त्याचाही रविवारी मृत्यू झाला आहे. या दोन मृत्युने बीड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युचा आकडा 14 वर पोहचला आहे. रविवारी पहाटे आलेल्या एका अहवालामध्ये 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये बीड शहरातील 6 जणांचा समावेश आहे. हे सर्व कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या सहवासात आलेल्या व्यक्ती आहेत. यात विद्यानगर पश्चिम भागातील 46 वर्षीय महिला, सावता माळी चौकातील 78 वर्षीय पुरूष, शिवनेरी कॉलनीतील 60 वर्षीय महिला, कॅनॉल रोड भागातील 70 वर्षीय पुरुष, शाहुनगर भागातील 50 वर्षीय पुरूष, कारंजा खंदक भागातील 45 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. बीड पाठोपाठ परळीमध्येही 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते पॉझिटिव्ह रूग्णाच्या सहवासातील आहेत. यात गुरूकृपा नगर येथील 24 वर्षीय पुरुष, जुने रेल्वे स्टेशन भागातील 38 वर्षीय पुरुष, जुना रेल्वे स्टेशन भागातील 31 वर्षीय पुरुष, भोई गल्ली भागातील 23 वर्षीय पुरुष, बरकतनगर भागातील एक पुरुष यांचा समावेश आहे. तर आष्टीमध्ये आणि अंबाजोगाईमध्ये एक एक रुग्ण आढळला आहे.
बीड शहरात चार तर अंबाजोगाईमध्ये एका ठिकाणी संचारबंदी
कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या भागात तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करून संचारबंदी लागू केली जाते. बीड शहरातील शाहुनगर, शिवनेरी कॉलनी, इमामपूर रोड, कॅनॉल रोड, भद्रामारुतीनगर, सावतीमाळी चौक, विद्यानगर पश्चिम, अंबाजोगाई शहरातील आदर्शनगर या भागात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.



























































