ऑस्ट्रेलियातील टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलला, आयसीसीच्या बैठकीत निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियात या वर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर या कालावधीत होणारा टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आला आहे. आयसीसीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात आला. टी-20 वल्र्ड कप पुढे ढकलल्यामुळे आता बीसीसीआयचा आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहे. आता आयपीएलबाबतची अधिकृत घोषणाही बीसीसीआयकडून लवकरच करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

पुढील तिन्ही वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच

आता पुढील तीन वर्षांमध्ये आयसीसीकडून तीन मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. 2021 व 2022 सालामध्ये टी-20 वर्ल्ड कपचे तर 2023 सालामध्ये वन डे वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही वर्ल्ड ऑक्टोबर-नोव्हेंबमध्येच खेळवण्यात येणार आहेत. 2021 सालामध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला, तर 2022 टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला आणि 2023 सालामधील वन डे वर्ल्ड कपचा अंतिम सामना 26 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल.

आयपीएलची अधिकृत घोषणाही लवकरच

बीसीसीआयकडून यंदाच्या आयपीएलची घोषणाही आता लवकरच करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर बीसीसीआयकडून याबाबत निर्णय घेण्यात येईल. हिंदुस्थानात कोरोना अद्याप नियंत्रणात आला नसल्यामुळे आयपीएल युएईत खेळवण्याची तयारी केली जात आहे. खेळाडूंची कोरोना चाचणी, क्वारंटाईन कालावधी आणि हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलिया दौरा या सर्व बाबींवर लक्ष देऊन आयपीएलच्या तारखा ठरवल्या जातील. आयपीएल लढतींची प्रक्षेपण करणारी स्टार इंडिया वाहिनीला दिवाळीपर्यंत ही स्पर्धा सुरू ठेवायची होती. पण दिवाळीच्या कालावधीत खेळाडूंना कुटुंबासोबत रहायला मिळावे यासाठी बीसीसीआय दरवर्षी या दरम्यान कोणत्याही लढतींचे आयोजन करत नाही.