नव्या ग्राहक कायद्यात तक्रार करण्यासाठीच्या ‘कोर्ट फी’मध्ये घसघशीत कपात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने सोमवारपासून लागू केलेल्या नव्या ग्राहक कायद्यात आता ग्राहकांना ग्राहक मंच किंवा आयोगाकडे करायच्या तक्रारींच्या शुल्कात कपात करण्यात आली आहे. तर पाच लाखापर्यंतच्या प्रकरणात कोणतेही तक्रार शुल्क असणार नाही. केवळ आठ कोटी ते दहा कोटींच्या प्रकरणात तक्रार शुल्क पाच हजाराऐवजी सहा हजार रूपये करण्यात आले आहे. तर दहा कोटींच्या वरील प्रकरणात तक्रार शुल्क पाच हजाराऐवजी 7,500 रूपये करण्यात आले आहे. मात्र, बहुतेक जण घरात घेणाऱया गृहोपयोगी वस्तू या पाच लाखांच्या आतीलच असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना एक पैसाही कोर्ट फि भरावी लागणार नसल्याने त्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.

ग्राहकांना ग्राहक मंच किंवा आयोगाकडे तक्रार करताना विशिष्ठ तक्रार फी (कोर्ट फी) भरावी लागते, त्या फीमध्ये कपात करण्यात आली आहे. नव्या कायद्यात फीचे स्वरूप बदलून पाच लाखांच्या सेवेसाठी खर्च केलेल्या रकमेत फसवणूक झाल्यास तक्रार करायची असल्यास तक्रार शुल्क लागणार नसल्याचे मुंबई ग्राहक पंचायची कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी म्हटले आहे. दहा कोटीची वस्तू उदा. मोठी सदनिका घेणारी व्यक्तीला 7,500 फी म्हणजे फारशी मोठी नाही. मुख्य म्हणजे ग्राहकांची बहुतांशी वस्तु-सेवांची खरेदी ही पाच लाखांहुन कमीच रकमेची असते. त्यांना एक पैसाही ‘कोर्ट फी’ म्हणून द्यावा लागणार नसल्याचे शिरीष देशपांडे यांनी स्पष्ट केले.

दहा कोटींच्या करील दावे दिल्लीत राष्ट्रीय आयोगाकडे
जिल्हा ग्राहक आयोगापुढे आता 20 लाखांऐवजी एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे सुनावणीला येतील तर राज्य आयोग एक ते दहा कोटी पर्यंतच्या दाव्यांची सुनावणी घेईल. दहा कोटींहून जास्त मुल्याच्याच दाव्यासाठीच ग्राहकांना दिल्ली येथे राष्ट्रीय आयोगापुढे जावे लागेल, यापूर्वी एक कोटींहून जास्त मुल्यांच्या तक्रारींसाठी ग्राहकांना दिल्लीला जावे लागत असायचे.