
बीड जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री आलेल्या अहवालामध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 25 ने वाढ झाली आहे. बीड जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 533 वर पोहचला आहे. रात्री आलेल्या अहवालात बीड शहरातील 6, परळीतील 12, गेवराईतील 6 आणि पाटोद्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी मध्यरात्री आलेल्या अहवालामध्ये अजून 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात बीड शहरामधील 6, परळीतील 12, गेवराईतील 6 आणि पाटोद्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले हे सर्व रुग्ण असून बीड जिल्ह्यामध्ये रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेनमेंट झोन केले जात आहेत. बीड आणि परळी शहरातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. बीड जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 533 वर पोहचली आहे. आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 225 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 277 जणांवर कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कंटेनमेंट झोनची संख्या 135 वर
बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 533 वर कोरोनाबाधितांची संख्या गेली आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळणाऱ्या भागात संक्रमण रोखण्यासाठी कंटेनमेंट झोन केले जात आहेत. आतापर्यंत कंटेनमेंट झोनची संख्या 135 वर गेली आहे. बीड जिल्ह्यात अजूनही 6 रुग्ण गंभीर आहेत. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रूग्णालयात 5 जणांवर आणि अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात एका गंभीर रुग्णावर उपचार सुरू आहेत.



























































