… म्हणून नगर पंचायतीच्या अध्यक्षांची गाढवावरून मिरवणूक काढली, कारण ऐकून हैराण व्हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्नामध्ये घोड्यावर बसून नवरदेवाची मिरवणूक काढण्याची प्रथा देशभरात आहे. मात्र सोमवारी मध्यप्रदेश मधील इंदूर येथे नवरदेवासारख्या सजलेल्या व्यक्तीची चक्क गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. यामागील रहस्यमय कारण ऐकून तुम्ही देखील अवाक व्हाल. यात आणखी विशेष म्हणजे ही कोणा ऐऱ्या-गैऱ्याची मिरवणूक नव्हती तर नगर पंचायतीचा अध्यक्ष याची मिरवणूक होती.

ढोल-ताशे आणि तरुणांच्या गराड्यात निघालेली ही मिरवणूक पाहून रस्त्यावरून जाणारा-येणारा प्रत्येक जण हैराण होत होता. सजून-धजून गाढवावर बसलेला नवरदेव, ढोल-ताशांचा गजर आणि वऱ्हाडी असा लवाजमा रस्त्यावरून निघाला. पण घोड्याऐवजी गाढवावर बसलेला नवरदेव पाहून प्रत्येकाच्या मनात हे असे का? असा प्रश्न उपस्थित होत होता.

‘लाईव्ह हिंदुस्थान’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही मिरवणूक इंदूरजवळील ग्रामीण भागात काढण्यात आली आणि गाढवावर बसलेला व्यक्ती नगर पंचायतीचा अध्यक्ष शिवा डींगु होता. भर पावसाळ्यात इंदूर आणि परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने त्यांनी हे पाऊल उचलले.

पुरातन मान्यतेनुसार गावात पाऊस पडत नाही तेव्हा गावचा प्रमुख व्यक्तीची गाढवावर बसवून मिरवणूक काढण्यात येते. नवरदेवासारखे सजून, ढोल-ताशांच्या गजरात गाढवावर बसून मिरवणूक काढल्याने आणि स्मशानात मीठ व कापूस जाळल्याने वरून देवाची कृपा होते, असेही त्यांनी सांगितले. तसेच याआधी देखील असे करण्यात आले होते आणि त्याचा परिणाम चांगला झाला व पाऊसही चांगला पडला, असेही त्यांनी सांगितले.