रेल्वेच्या कॉन्टॅक्टलेस तिकीट तपासणीसाठी क्यू आर कोडचा वापर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखणे हे आव्हान ठरत असून विविध माध्यमातून स्पर्शरहीत कामकाजाला प्राधान्य दिले जात आहे. आता मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील नाशिकसह सर्व स्थानकांवर क्यू आर कोडच्या सहाय्याने कॉन्टॅक्टलेस तिकीट तपासणी सुरू झाली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने देशभरात 23 मार्चपासून लॉकडाऊन करावे लागले, तेव्हाही मध्य रेल्वेने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बाबतीत पुढाकार घेऊन सेवा दिली. प्रवासी सेवा थांबविण्यात आली होती. मात्र पुरवठा साखळी कायम ठेवण्यासाठी मालवाहतूक व पार्सल वाहतूक सुरूच होती. त्यानंतर रेल्वेने 12 मेपासून पंधरा वातानुकूलित विशेष गाडय़ा सुरू केल्या होत्या. अनलॉक -1 च्या घोषणेनंतर निवडक 200 विशेष गाडय़ा 1 जूनपासून देशात धावू लागल्या. राज्य शासनाने निश्चित केलेल्याअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांसाठी मध्य रेल्वे उपनगरी भागात 352 विशेष लोकल गाडय़ा चालवित आहे. यादरम्यान प्रवासी व तिकीट पर्यवेक्षक यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी भुसावळ रेल्वे मंडळाने स्पर्शविरहित तिकीट तपासणीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वे स्थानकांच्या तिकीट आरक्षण खिडकीवर तिकीट नोंदणी करताना प्रवाशांना त्यांचा मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. मोबाईलवर क्यूआर कोडसाठी एक युआरएल लिंक देण्यात येत आहे. या लिंकच्या सहाय्याने प्रवाशाला क्यूआर कोड दिसू शकतो.

तिकीट पर्यवेक्षकाला हा कोड स्कॅन करून प्रवाशाबद्दल व त्यांच्या रेल्वे आरक्षणाबद्दल संपूर्ण माहिती योग्य ते अंतर राखून मिळवता येत आहे. विनास्पर्श तिकीट तपासणी करता यावी हा यामागचा मुख्य उद्देश साध्य झाला आहे. भुसावळ मंडळात नाशिक जिल्ह्यातील नाशिकरोड, मनमाड, इगतपुरीसह सर्व स्थानकांचा समावेश असून या सर्व ठिकाणी क्यू आर कोडच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून तिकीट तपासणी सुरू झाली आहे, अशी माहिती भुसावळ मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.